ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील पदपथांवर दुकानांना परवानगी

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागातील फेरीवाल्यांचा प्रश्न वारंवार डोके वर काढत असताना, पूर्व भागातील स्थानकालगतचे पदपथही टपऱ्यांनी अडविले आहेत. त्यात महापालिकेने अपंग व्यक्तींसाठी मंजूर केलेले स्टॉल आणि परिवहन उपक्रमाच्या टपऱ्यांचा समावेश आहे. स्थानकालगतचा पदपथ या टपऱ्यांनी पूर्णपणे अडवल्यामुळे नागरिकांना वर्दळीच्या रस्त्यावरून रिक्षा, बस व अन्य वाहनांतून वाट काढावी लागत आहे.

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रोज लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. स्थानकाच्या पूर्वेकडील भागात विविध कंपन्यांच्या बसगाडय़ा नोकरदारांची वाहतूक करतात. विविध परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ाही येथून प्रवासी वाहतूक करतात. तसेच घोडबंदर ते ठाणे स्थानक या मार्गावर बेकायदा वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ाही प्रवाशांची ने-आण याच भागातून करतात. त्यामुळे या भागात वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. त्या तुलनेत येथील रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीही होते आहे. त्यातच पदपथच शिल्लक न राहिल्यामुळे या गर्दीत पादचाऱ्यांचीही भर पडत आहे.

ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील पदपथावर महापालिकेने अपंग व्यक्तींसाठी मंजूर केलेले स्टॉल थाटण्यात आले आहेत. याशिवाय, वसई-विरार महापालिका परिवहन उपक्रमाची टपरी आणि खाद्यपदार्थाचे स्टॉलही इथे सुरू आहेत. अपंगांच्या स्टॉलवर महापालिकेने मंजुरी दिलेल्या ठरावाची माहिती मोठय़ा अक्षरांमध्ये लिहिण्यात आली आहे. त्यामुळे पदपथ अडविणाऱ्या स्टॉलला महापालिकेचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर ठाणे महापालिका परिवहन सेवेचा बस थांबा आहे. त्या परिसरात उपलब्ध जागेवर विविध परिवहन उपक्रमांना त्यांच्या टपऱ्या उभारणे शक्य आहे. मात्र या परिवहन उपक्रमांनी पदपथ अडवून टपऱ्या उभ्या केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

अपंग व्यक्तींसाठी मंजूर केलेल्या स्टॉलची जागा स्थावर मालमत्ता विभागाकडून मंजूर करण्यात येते. त्यांनी मंजूर जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी स्टॉल लावले असतील तर त्यांची तपासणी करून कारवाई करण्यात येईल.

– मारुती गायकवाड, सहायक आयुक्त, नौपाडा-कोपरी विभाग