पवार क्रीडा संकुलात पालिका अधिकारी, नगरसेवकांना ५० टक्के सवलतीत सदस्यत्व; सर्वसामान्यांना मात्र दीड लाख रुपयांचे शुल्क
सर्वसामान्य कुटुंबांतील क्रीडापटूंना खेळाच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून ढोकाळी परिसरात उभारण्यात आलेल्या पालिकेच्या शरदचंद्रजी पवार क्रीडा संकुलात सदस्यत्व मिळवण्यासाठी ठाणेकरांना एक ते दीड लाख रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार असताना पालिकेतील अधिकारी आणि नगरसेवकांना मात्र चक्क ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. केवळ अधिकारी व नगरसेवकच नव्हे तर नगरसेवकांच्या नातेवाइकांनाही ही सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे, ठाणे क्लब येथे नेमक्या अशाच निर्णयावरून पालिकेचे तोंड चांगलेच शेकले होते. परंतु, तरीही ‘नियमांना अधिन राहून’ पालिकेने आपल्या गोतावळय़ाच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
झपाटय़ाने वाढणाऱ्या घोडबंदर परिसरात महापालिकेमार्फत एखादे क्रीडा संकुल उभारले जावे, अशी मागणी ठाण्याचे तत्कालीन खासदार संजीव नाईक यांनी लावून धरली होती. तत्कालीन आयुक्त आर.ए.राजीव यांनी ही मागणी लागलीच उचलून धरली. खासदार निधी आणि महापालिकेच्या पैशातून ढोकाळी परिसरात उभे राहिलेल्या या संकुलाचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला आणि संकुलात नावही त्यांचेच देण्यात आले. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले या संकुलाचे लोकार्पण होऊन आता अडीच वर्षांचा कालावधी लोटला आहे. हे संकुल आपल्याच एका संस्थेस चालविण्यास दिले जावे असा हट्ट मध्यंतरी याच भागातील एका राजकीय नेत्याने धरला. मात्र, जयस्वाल यांनी हा हट्ट पुरविला नाही आणि या कामासाठी स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. या निविदा काढताना या संकुलासाठी आकारल्या जाणाऱ्या सभासद शुल्काची निश्चिती प्रशासनाने केली असली तरी नगरसेवक, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांवर मात्र सवलतींचा वर्षांव करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने निश्चित केल्याप्रमाणे या संकुलाचे आजीव सभासद व्हायचे असेल तर सर्वसामान्य ठाणेकरांना ७५ हजारांपासून दीड लाखांपर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे. दीड लाख रुपयांचा भरणा केल्यास पुढे वर्षांला कोणतेही वेगळे शुल्क सदस्यांकडून आकारले जाणार नाही. या संकुलात महापालिकेमार्फत बॅडिमटन कोर्ट, व्यायामशाळा, बास्केटबॉल, किकेट, टेबल टेनिस, बुद्धिबळ आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. संकुलाचे सदस्यत्व दहा वर्षांसाठी घ्यावयाचे असल्यास ३० हजार रुपये, तर पाच वर्षांसाठी १५ हजार रुपयांची आकारणी केली जाणार आहे.
याशिवाय वर्षांला काही प्रमाणात शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली. हे संकुल पूर्णपणे खासगी ठेकेदारामार्फत चालविले जाणार असले तरी शुल्क आकारणी मात्र महापालिकेने ठरविलेल्या दरांनुसारच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी शुल्क दर जाहीर करत असताना प्रशासनाने नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या २१ वर्षांपर्यंतच्या मुलांनाही ही सुविधा लागू असणार आहे.

ठाणे महापालिकेने उभारलेल्या सर्वच क्रीडा संकुलांमध्ये अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे धोरण महापालिकेने यापूर्वीच स्वीकारले असून केवळ पवार संकुलाविषयी वेगळा निर्णय घेणे योग्य झाले नसते.
संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी