सुमारे दीड वर्षांनंतर होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीच्या सदस्यपदासाठी सर्वच पक्षांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. येत्या २० जूनला होणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येक प्रमुख पक्षाच्या वाटणीला एकेक जागा आली असताना इच्छुकांची संख्या मात्र प्रत्येकी दहा-बारा आहे. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले, पराभूत झालेले, पक्षादेशानंतर उमेदवारी मागे घेणारे अशा साऱ्यांनाच परिवहन समितीवर जाण्याचे वेध लागल्याने या समितीच्या निवडणुकीला कमालीचे महत्त्व आले आहे.

ठाणे परिवहन समितीच्या निवडणुकीसाठी १७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. उमेदवारी दाखल करण्यास आता एकच दिवस उरला असताना कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार जाहीर न केल्याने  इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. मात्र, एका जागेसाठी दहा-दहा जण इच्छुक असल्याने कोणाला निवडायचा, असा प्रश्न वरिष्ठ नेत्यांसमोर पडला आहे.

परिवहन समितीवर एकूण १२ सदस्यांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभेमध्ये गुप्त मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या पक्षाची मते फुटण्याची भीतीही सर्व पक्षांना जाणवत आहे. यावर तोडगा म्हणून संख्याबळानुसार सामोपचाराने सदस्यांची निवड करण्यासाठी विविध पक्षांत चर्चा सुरू असल्याचे समजते.

राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी गटात मनसे आणि काँग्रेस पक्षाची कोकण आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. 2त्यामुळे या पक्षांना लोकशाही आघाडी गटाचा व्हिप लागू होत असल्याने या गटाच्या गटनेत्याने व्हिप काढला आहे. त्यामुळे मनसेला लोकशाही आघाडी गटाकडेच मतदान करावे लागणार आहे, तर भाजपचा स्वतंत्र गट असल्याने त्यांची भूमिका या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे.

गेल्या वर्षी परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या दगाफटक्यामुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजप आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

परिवहनची समीकरणे

’शिवसेना-भाजप युतीच्या वाटय़ाला सात जागा आहेत. मात्र सेना-भाजप वेगवेगळे निवडणूक लढले तर मात्र त्यांना सहाच जागा मिळतील.

’काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे एकत्र लढले तर त्यांना पाच जागा मिळू शकतील. मात्र वेगळे लढल्यास राष्ट्रवादीच्या वाटय़ास तीन तर काँग्रेसला एक अशा चार जागा मिळू शकेल.