पूर्वी छोटय़ा प्रमाणावर पाळल्या जाणाऱ्या कोंबडय़ांचे स्वरूप काहींनी बदलत मोठय़ा प्रमाणावर कुक्कुटपालन आणि वराहपालनाचा व्यवसाय सुरू केला. ईस्ट इंडियन समाज विशेषत: सुतारकामात होते. त्यांच्या विभागाला कारपेंटरी असे संबोधले जात होते. या समाजातील लोक पूर्वी वसई किल्ल्यात सुतारकाम करीत असत. त्यांची वसाहतदेखील किल्ल्याजवळ होती.

कोळी आणि तत्सम समाजातील प्रमुख व्यवसाय मासेमारी हाच आहे. ते मासे पकडण्यासाठी ज्या जाळ्याचा वापर करतात त्याला डोल असे म्हणत. विविध प्रकारचे मासे पकडण्यासाठी विविध प्रकारचे जाळे वापरले जाते. हे मासे बांबूपासून टोपलीत ठेवत ज्याला पाटी असे म्हणतात. ओले मासे सुकवण्यासाठी किनाऱ्यावर साधारण ६ फूट उंचावर बांबू रोवून, त्यावर चटई अंथरतात ज्यास ‘फरकं’ असे म्हणतात. मग त्यावर मासे पसरवून ते सुकण्यासाठी ठेवतात. सुके मासे बनवण्यासाठी बांबूची चौकट बनवली जाते, त्यामध्ये एक-दोन फुटांवर आडवे बांबू बांधले त्यावर मासे अडवले जातात. त्याला वलांडी असे म्हणतात. कालांतराने मासेमारीच्या व्यवसायात बर्फाने मोठा बदल घडवून आणला.

मासेमारी करणारा समाज सोडून इतर सर्व समाजाने आपले बॅण्डपथक निर्माण केले होते. जन्मप्रसंगी, लग्नसोहळे, सण-समारंभ आणि मृत्यू या वेळी बॅण्ड वाजला जातो. सुरुवातीला हौशी तरुणांनी बॅण्डचे वाजवण्याचे शिक्षण घेऊन ते वाजवू लागले. नंतर त्याचे व्यवसायात रूपांतर झाले आणि मग सर्व समाजात वाजंत्री पथके दिसू लागली.

शेतीची साधने

पाऊस सुरू झाल्यावर पेरणी केल्यानंतर, लावणी करण्यासाठी भाताची रोपे काढावी लागतात. हे काम घरातील स्त्रिया शेतामध्ये बसून करीत त्यासाठी ते टिबयचा वापर करीत असे. कडधान्य जमिनीत रुजवण्यासाठी खिळ्याचा वापर केला जाई. खिळ्याने जमिनीत एक-दोन इंच खड्डा करून त्यात बियाणे पेरून त्यावर पुन्हा मातीचा थर दिला जात असे. पूर्वी नांगरणीसाठी मजबूत लाकूड आणि लोखंडापासून बनवलेले नांगर वापरत असत. नांगरलेली जमीन सपाट करण्यासाठी सागाच्या लाकडाची अळी बनवण्यात येत असे आणि त्यानेच जमीन सपाट केली जात असे. शेतीच्या सामानाची ने-आण करण्यासाठी गाडा किंवा बैलगाडीचा वापर करीत असे. शेतावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी बांबूच्या सालांपासून बनवलेल्या इरल्याचा वापर करीत असे. त्याचबरोबर, रहाट, पाय-रहाट, हातअळी, कुदळ, फावडा, विळा (गवत, चारा, झाडाची पाने कापण्यासाठी), विळी, लांब विळी (झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी), कोयता (केळीचे लोद खणून काढण्यासाठी), कोयती (नारळाच्या झावळ्या, केळीचे खोड तोडण्यासाठी), कुऱ्हाड, पहार (जड लाकूड, दगड या जागेवरून त्या जागेवर हलवण्यासाठी), टिकाव (जमिनीतील ढेकळे फोडण्यासाठी लोखंडी दांडा), खुणपा (खिळा), बरची (लोखंडी पाता), घुंगरू काठी, खुरपा (गवत गोळा करण्यासाठी वापरला जाणारा पंजा), कुडई (कांद्याचे रोप लावण्यासाठी), पराणी (लोखंडी दाभण), मोगरी (जमिनीतील ढेकळे फोडण्यासाठी लापरसा जाणारा लाकडी ठोकळा), शिडी (केळीच्या झाडाला टेकू बांधण्यासाठी), कोडेळी (मळणीच्या वेळी वापरली जाणारी बांबूची काठी), आकेरा (आंबे तोडण्यासाठी काठीला बांधलेली जाळी), आकुडी (शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी), पाग-आसू-घोळ्या (विहीर किंवा तळ्यातील मासे-खेकडे पकडण्यासाठी) इत्यादी साधनांचा वापर शेती-बागायतीसाठी करण्यात येतो.

वसईतील सद्य:परिस्थितीत या पारंपरिक व्यवसायांचे प्रमाण अतिशय घटलेले आहे. येथील अनेक ख्रिस्ती लोक परदेशात नोकरी करीत आहेत. तर बाकीचे लोक विविध शहरांत तसेच मुंबईतून रोज नोकरीसाठी ये-जा करतात. अनेक लोक आधुनिक व्यवसायातही गुंतलेले आहेत. भाग-२

दिशा खातू

@Dishakhatu