16 February 2019

News Flash

वसईतील ख्रिस्तायण : नाताळमधील खाद्यसंस्कृती

वसईत नाताळसाठी विशेष फराळ बनवला जातो. त्यातील शिंगोळ्या किंवा हिंगोळ्या हा पारंपरिक प्रकार आहे.

वसईत नाताळसाठी विशेष फराळ बनवला जातो.

नाताळ म्हटला की केक समोर येतो, परंतु वसईत नाताळानिमित्ताने विविध पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात हिंगोळ्या, भरडीचे लाडू, नारळाच्या वडय़ा, रोझा (कुकीजचा प्रकार), चिरोटे, मॅझिपॅन, जुजूब बनवले जातात. वाइनही घरी बनवण्यात येते. जेवणासाठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थामध्ये इंदोलो, फुगे, चितापे, पानकडय़ा आदी विविध चविष्ट खाद्यपदार्थ बनवले जातात. नाताळ सणाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. तर घराघरांतून खमंग पदार्थ बनवण्याचा सुंगध दरवळत असेल. आता आपण वसईतील नाताळमधील खाद्यसंस्कृतीची सफर करूया आणि येथील पारंपरिक खाद्यपदार्थाविषयी जाणून घेऊया.

वसईत नाताळसाठी विशेष फराळ बनवला जातो. त्यातील शिंगोळ्या किंवा हिंगोळ्या हा पारंपरिक प्रकार आहे. शिजवलेली चण्याची डाळ, सुके खोबरे, वेलची, गूळ याचे पुरण मळून तांदळांच्या पिठात, हळद, मीठ घालून पिठाच्या पोळीवर सारण भरून ते वाफवले जातात. त्यात बदल होऊन मग उकडलेल्या तांदळाच्या पोळीवर भरून त्या भाजून घेऊ  लागले. पुढे गव्हाच्या पिठात सारण भरून शिंगोळ्या तळू लागले. कालांतराने करंज्यांचा यात समावेश झाला, तसेच बेसन, रव्याचे लाडू बनवले जातात. भरडीचे लाडू बनवण्याची परंपरा आहे. यासाठी हातसडीचे तांदूळ भाजून त्याचा रवा बनवून त्यात गूळ, वेलची, लवंग, दालचिनी, तीळ, खसखस इत्यादी मिश्रण एकत्र करून लाडू वळतात किंवा गुळाच्या पाकात इतर पदार्थ एकत्र करून थापून त्याच्या वडय़ाही बनवतात. मैदा, अंडी, नारळाचे दूध, लोणी, बेकिंग पावडर इत्यादी मिश्रण फेटून नंतर त्याला काटय़ा चमच्याने आकार देऊन तळतात आणि वेलची पूड घातलेल्या साखरेच्या पाकात बुडवतात किंवा वरून पिठीसाखर, वेलची पूड भुरभूरले की मग किडी किंवा कलकल तयार होते. येथे कुकिज, बिस्किटे ही रवा, मैदा आणि बेसनापासून बनवतात आणि चुलीवर किंवा भट्टीत निखाऱ्यावर बेक करतात. नारळांच्या वडय़ांचा पुढचा प्रकार म्हणजे खोबरे, पिढीसाखर, अंडी इत्यादींपासून बनवलेले कोकोनटीज. डिप फ्राय कुकिजही बनवण्यात येतात. त्यांना रोझा किंवा रोझ कुकीज म्हणतात. नारळाचे दूध, मैदा, अंडय़ाच्या मिश्रणाला विविध आकाराच्या साच्यातून तेलात सोडून तळून काढतात, तसेच या भागात चिरोटेही बनवण्यात येतात, त्यांना बोलीभाषेत खजल्या असे म्हणतात. काजू किंवा बदामापासून मॅझिपीन किंवा मॅझिपॅन बनवले जाते. त्यासाठी रात्रभर भिजवलेले काजू किंवा बदामात गुलाबपाणी, साखर, लोणी, दूध, पाणी घालून मंद आचेवर आटवून त्यांना थापून वडय़ा पाडल्या जातात. लहान मुलांचा आवडता प्रकार जुजुबदेखील घरीच बनवण्यात येतो. त्यासाठी पपईचा रस, साखर आटवून त्याच्या वडय़ा पाडून साखरेचे दाणे भुरभुरले जातात.

नाताळच्या दिवशी जेवणासाठीही विशेष पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये, तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून फुगे हा पारंपरिक पदार्थ बनवण्यात येतो. हे मिश्रण ताडी किंवा ईस्ट घालून आंबवून तळले जातात. हे चहासोबत किंवा चॉकलेट सॉससोबत खाल्ले जाते. काही लोक या पिठात गूळ घालून तळतात त्यास उंबरे असे म्हणतात. तांदूळ, उडदाच्या डाळीचे आंबवलेले मिश्रण थाळीवर पसरवून उकळत्या पाण्यावर ठेवून वर कबूड्डर लावून वाफवले की चांदणी तयार होते. इडलीच्या मिश्रणाचे सालने बनवले जातात. तांदूळ आणि उडीद डाळीच्या आंबवलेल्या मिश्रण तव्यावर लहान गोलाकार आणि जाडसर पसरवून भाजले जातात त्यास पोळे असे म्हणतात, तर याच मिश्रणाला पातळ आणि मोठे गोलाकार तव्यावर पसरवून भाजले की त्यास चिटापे किंवा शितापे असे म्हणतात.

या पदार्थासोबत खाण्यासाठी काही खास मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ बनवतात. इंदेलो हा वसईतील प्रसिद्ध पदार्थ आहे. कोंडीचे मांस आणि डुक्कराच्या वजडी, काळीज स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून त्याला मीठ, तिखट, धणे-जिरे पूड लावून ठेवतात. नंतर त्यात तेल, आले-लसूण पेस्ट, ईस्ट इंडीयन मसाला आणि मुरण्यासाठी उसाच्या रसापासून घरी बनवलेले व्हिनेगर घालतात आणि एक तास शिजवतात. आणखी एक पदार्थ म्हणजे बकऱ्याचे फुफ्फुस, आतडयाच्या मनुक्या एवढय़ा फोडी करून त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, आले-लसूण, व्हिनेगर, मिरची, ईस्ट इंडीयन मसाला घालून सरपतेल बनवतात, तर तेलात कांदा, आले, लसूण, हळद, मीठ घालून त्यात बकऱ्याची विशिष्ट हाडे आणि लाल भोपळ्याचे तुकडे परतून त्यात नारळाचे दूध, ईस्ट इंडीयन मसाला, धणे-जिरे पूड, लाल तिखट, कोथिंबीर आणि व्हिनेगर घालून शिजवून टेपरात पदार्थ बनवतात, तसेच चिकन करी, मटन करी बनवण्यात येते. शाकाहारी जेवणात पालेभाज्या, फळभाज्या, मिक्स पालेभाज्या तर येथील प्रसिद्ध वाल-वांग्याचे भरीत आणि घेवडा-वांग्याची भाजी आले, लसूण, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड घालून बनवण्यात येते. आणखी एक पारंपरिक पदार्थ म्हणजे ढेस्का, जो पाण्यात भिजवलेल्या कोवळ्या केळफुलांचा किस, तांदळाची पीठ, शेंगदाणे, वाल, कोलंबी इत्यादी पदार्थाचे मिश्रण करून केळीच्या पानावर थापून निखाऱ्यांवर भाजून बनवला जातो. वसईत द्राक्षरस म्हणजेच वाईन घरी बनवण्याची प्रथा आहे.

केक आणि इतर गोड पदार्थ

* केक हा नाताळमधील महत्त्वाचा आणि सर्वाचा आवडता पदार्थ. वसईत पारंपरिक पद्धतीने अन्न चुलीवर बनवतात. काही विशेष स्थानिक केकचे प्रकारच येथे बनवण्यात येतात. रेवाळे हा सर्वात जुना पदार्थ आहे. दुसरा पदार्थ म्हणजे दोदल तांदळाचे बारीक पीठ, गूळ, नारळाचे दूध, दालचिनी, लवंग. जायफळ, वेलची घालून चुलीवर मातीच्या भांडय़ात खापऱ्याने  घोटून शिजल्यावर मग त्याचा थर बनवला जातो. या भागात दह्य़ाचा केक हा दही, साखर तेल, मैद्याच्या मिश्रणाने बनवतात. वसई गावात तर चक्क मैदा आणि दह्य़ापासून डोनटस् घरीच बनवण्यात येतात. आणखी एक घरगुती केक जो सुके खोबरे, रवा, अंडी, लोणी इत्यादींपासून बनवला जातो.

* भाकरीचे तुकडे, गूळ, नारळाचे दूध एकत्र करून आटवून भाकरमोड हा चविष्ट पदार्थ पूर्वी घरोघरी बनत असे. तसेच तांदुळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ, लवंग, वेलची एकत्र करून छोटय़ा छोटय़ा केळीच्या पानावर थापून, शिजवून पुन्हा निखाऱ्यावर केळीच्या पानासहित भाजून त्या पानाला काटी लावून मग खात यास पानकाडय़ा असे म्हणतात.

दिशा खातू @Dishakhatu

First Published on December 12, 2017 2:07 am

Web Title: traditional christmas recipes