ठाणे शहरातील लोक हॉस्पिटल चौक ते खेवरा सर्कल दरम्यान असलेल्या ग्लॅडी अल्वारिस मार्गावर येत्या रविवारी एका खासगी कंपनीच्या कार्यक्रमामुळे वाहतूक बदल करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामुळे या भागात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहून नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी हिरानंदानी मेडॉस, पवारनगर, लोक हॉस्पिटल तसेच इतर भागातून टिकुजिनीवाडी व मानपाडा बाजूकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोक हॉस्पिटल चौक ते खेवरा सर्कल दरम्यान जाणाऱ्या मार्गिकेवर रविवार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
या मार्गाला पर्याय म्हणून हिरानंदानी मिडॉस, पवारनगर, वसंत विहार सर्कलकडून डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह चौक ते हॅप्पी व्हॅली चौक मार्गे टिकुजिनीवाडी, मानपाडा बाजूकडे जाणारी वाहने खेवरा सर्कल ते लोक हॉस्पिटल चौक या एकाच मार्गिकेवरून इच्छितस्थळी जातील. लोक हॉस्पिटल चौक ते खेवरा सर्कल दरम्यान रविवारी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत दुतर्फा सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, यासंदर्भात असलेल्या हरकती व सूचना पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, तीन हात नाका, ठाणे येथे पाठवाव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी केले आहे.