अवजड वाहनांची घुसखोरी; पोलीस, व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहनकोंडी कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यांवर घेतलेला टोलमाफीचा निर्णय या नाक्यांवरील अव्यवस्थापनामुळे फसू लागला आहे. येथे होणारी अवजड वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी घोषणांपलीकडे कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

टोल आकारणी सुरू असताना या दोन्ही नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी किमान चार मार्गिका राखीव ठेवण्यात आल्या होत्या. टोलमाफीच्या निर्णयानंतर मात्र जेमतेम दोन ते तीन मार्गिकांमधून हलकी वाहने सोडली जात असून उर्वरित मार्गिकांवर होणाऱ्या अवजड वाहनांच्या घुसखोरीकडे पद्धतशीरपणे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र येथे दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, ऐरोली ते भांडुप पम्पिंग स्थानक आणि मुलुंड ते कोपरी पुलापर्यंत रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठीही फारसे प्रयत्न होत नसल्याने वाहनकोंडीत अडकण्याशिवाय प्रवाशांपुढे पर्याय राहिलेला नाही.

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम सुरू असल्याने नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर, पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच कल्याण-शीळ रस्त्यांवर अवजड वाहनांचा भार कमालीचा वाढला आहे. ही कोंडी असह्य़ होऊ लागल्याने प्रवाशांची वाढती नाराजी लक्षात घेऊन सरकारने ऐरोली आणि मुलुंड या दोन्ही टोलनाक्यांवर २३ सप्टेंबपर्यंत टोलमाफी जाहीर केली आहे. टोलमाफीमुळे या नाक्यांवरून हलक्या वाहनांचा वेग वाढेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारचा निर्णय जाहीर होताच या नाक्यांवर अव्यवस्थेचे दर्शन घडू लागले असून अवजड वाहनांच्या घुसखोरीकडे ठरवून कानाडोळा केला जात असल्याचा संशय आता प्रवाशांमधून व्यक्त होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तर या टोलनाक्यावरील सर्वच मार्गिकांमधून जड आणि अवजड वाहने प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.

व्यवस्थापन, पोलिसांचे दुर्लक्ष

अवजड वाहनांसाठी ठरावीक मार्गिका आरक्षित असल्याने पोलीस आणि टोलनाका व्यवस्थापनाकडून यापूर्वी नाक्यांपासून काही अंतरावर बॅरिकेड्स उभारले जात असत. हे नियोजन काटेकोरपणे करण्याचा प्रयत्न दिसत असे. टोलमाफीच्या निर्णयानंतर अवजड वाहनांचे नियोजन पद्धतशीरपणे कोलमडून पडले असून हे बॅरिकेड्स बाजूला सारून अवजड वाहने हलक्या वाहनांच्या मार्गिकांमध्ये शिरत असल्याचे दिसत आहे. हलक्या वाहनांच्या मार्गिकेत अवजड वाहन शिरल्यामुळे टोलबूथवर टोल वसूल होईपर्यंत अवजड वाहनाच्या पाठीमागील इतर हलक्या वाहनांना बराच काळ रेंगाळून राहावे लागते. सद्य:स्थितीत तीन मार्गिका अवजड वाहनांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात जवळपास सर्वच मार्गिकांमध्ये अवजड वाहने घुसखोरी करत असल्यामुळे हलक्या वाहनांचा खोळंबा होत आहे.

  • टोलमाफीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी या दोन्ही नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी किमान चार मार्गिका आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. अवजड वाहने डावीकडील कोपऱ्यातून दोन मार्गिकांमधून मार्गक्रमण करत असत.
  • टोलमाफीची अंमलबजावणी सुरू होताच नेमके उलट चित्र या ठिकाणी दिसत असून दोन्ही नाक्यांवर किमान चार मार्गिकांमधून अवजड वाहनांची घुसखोरी सुरू झाल्याने हलक्या वाहनांची नाकेबंदी होऊ लागली आहे.