१२ किमीचे अंतर आठ मिनिटांत पूर्ण करून हृदय प्रत्यारोपण यशस्वी
ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून ५० वर्षांच्या महिला रुग्णाचे जिवंत हृदय प्रत्यारोपणासाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात बुधवारी सकाळी नेण्यात आले. या दोन्ही रुग्णालयांदरम्यान एकूण १२ किलोमीटरचे अंतर असून, कमीत कमी वेळेमध्ये हे हृदय फोर्टिस रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्ता विनाअडथळा उपलब्ध करण्याची रुग्णालय प्रशासनाने वाहतूक पोलिसांकडे विनंती केली. वाहतूक शाखेच्या सहकार्यामुळे आठ मिनिटांत रुग्णवाहिका फोर्टिस रुग्णालयात पोहोचली. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधे उपचार घेणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेने हृदय दान करण्याचे ठरवले होते. हे हृदय फोर्टिस रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपणासाठी नेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. ठाणे आणि मुलुंडमध्ये असलेल्या या रुग्णालयांमधील अंतर १२ कि.मी. असून कमी वेळेत हा मार्ग पूर्ण करण्याची जबाबदारी वाहकांवर होती. फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी ठाणे वाहतूक पोलिसांना याबाबत माहिती दिली.

वाहतूक पोलिसांचे अभिनंदन
सकाळी ७.२१ वा. या महिला रुग्णाचे हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका ७.२९ वाजता मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात पोहोचली. त्यानंतर झालेली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. ठाणे वाहतूक विभागाच्या पोलीस उपआयुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी या कामात सहभागी झालेल्या वाहतूक पोलिसांचे आणि रुग्णवाहिका चालकांचे अभिनंदन केले.