News Flash

आदिवासींची उपासमार!

दररोज संध्याकाळी मजुरीचे पैसे घेऊन व्यवहार करण्याची आदिवासींची पद्धत आहे.

नोटा बदलून घेण्यासाठी भिवंडी तालुक्यातील अनेक गावांमधील बँकांबाहेर असे चित्र दिसत आहे.

‘बँकाच नाहीत तर रांग तरी कुठे लावणार?’;  नोटाबंदीमुळे सर्वच कामे उधारीवर, मजुरीही थकीत

देशातील धनदांडग्यांनी दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने शोधलेले ‘नोटाबंदी’चे औषध आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी जहर बनत चालले आहे. एकीकडे, शहरांमध्ये नोटा बदली करून घेण्यासाठी नागरिकांना बँकांबाहेर रांगांत तिष्ठत राहावे लागत असताना, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या येऊरमध्ये तर बँकाच नसल्याने येथील आदिवासी पाडय़ांत राहणाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. शेतातली कामे केल्यानंतर मिळणारी मजुरी चलनतुटवडय़ामुळे उधारीच्या खात्यावर जात असताना घरात अन्नधान्याची चणचण जाणवू लागल्याने येऊरमधील आदिवासी कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

ठाणे शहराच्या अतिशय जवळ असलेल्या येऊर डोंगरातील आदिवासी पाडय़ांवर अशी अवस्था असताना राज्याच्या दुर्गम भागांतील आदिवासी पाडे आणि खेडय़ांमध्ये काय परिस्थिती असेल, याची कल्पनाच करवत नाही. येऊरमध्ये जांभुळपाडा, पाटोणापाडा आणि वनीचा पाडा या ठिकाणी बहुसंख्य आदिवासींची वस्ती आहे. या पाडय़ांवर भात, नाचणी, ज्वारीची शेती केली जाते. सध्या पाडय़ावर भातकापणी सुरूअसून काम करणाऱ्या मजुरांना मजुरी देण्यासाठी शेतमालकांकडे सुट्टे पैसे अपुरे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मजुरांकडून कापणीची कामे उधारीवर करून घेतली जात आहेत. कापणीच्या कामासाठी एका दिवसाची मजुरी तीनशे रुपये दिली जाते. मात्र सुटय़ा पैशांअभावी मालकांना मजुरी देणे शक्य नाही. त्यामुळे गेला आठवडाभर त्यांना मजुरी दिली नाही. दररोज संध्याकाळी मजुरीचे पैसे घेऊन व्यवहार करण्याची आदिवासींची पद्धत आहे. आता दररोज मिळणारा पैसा बंद झाल्याने त्यांची कोंडी झाली आहे. याचा परिणाम साहजिकच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर होऊ लागला आहे. घरातील अन्नधान्य संपत आले तरी चलनाचा तिढा सुटला नसल्याने आता काय करायचे, असा प्रश्न या आदिवासींना पडला आहे.

येऊर परिसरात बँक नाही. येथील रहिवाशांचे ठाण्यातील वर्तकनगर येथील टीजेएसबी बँकेत जनधन बचत खाते आहेत. मात्र बँकेतील पैशांचे व्यवहार करण्यासाठी येऊर गाव ते वर्तकनगर असा प्रवास रिक्षा किंवा बसने करावा लागतो. यासाठी किमान चाळीस रुपये खर्च होतात. हे पैसे जुळवतानाच रहिवाशांची मारामार होत आहे. त्यात बँकेसमोरील रांगांमध्ये ताटकळत त्यांना अख्खा दिवस घालवायला लागत असल्याने मजुरीचे खाडे होऊ लागले आहेत. एवढे करून बँकेकडून दोन हजार रुपयांची नोट दिली जात असल्याने या नोटेचे सुट्टे कुठून मिळवायचे, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे या पाडय़ावरील रहिवासी रमेश वाळवी यांनी सांगितले.

झेंडूचा व्यवसाय ठप्प

आदिवासी पाडय़ावर झेंडूच्या फुलांची लागवड केली जाते. आदिवासी ही फुले ठाण्याच्या फुलबाजारात फुलविक्रेत्यांकडे विकतात. मात्र सुटय़ा पैशांच्या तुटवडय़ामुळे फुलांचा बाजारही मंदावला असल्याने त्याचा फटका आदिवासींच्या फूल व्यवसायाला बसत आहे.

सकाळी सहा वाजता घरून निघते. दहा किलोमीटरची पायपीट करून अनगावला येतेय. गेले दोन दिवस सतत येऊनही बँकेतील पैसेही मिळाले नाहीत. पुन्हा आता पायपीट करून घरी जावे लागणार आहे.

– लक्ष्मी जाधव, आवलेटा, वाडा 

गेले तीन दिवस बँकेत खेटे घालत आहे. तरीही पैसे मिळू शकले नाहीत. अशा आता किती फेऱ्या माराव्या लागणार माहिती नाही. पैसे असूनही आम्ही कंगाल झालो आहोत.

– गुणवंती पाटील (वय ६८), सुपेगाव, वाडा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 2:47 am

Web Title: tribal suffer with currency note ban
Next Stories
1 ‘अमृत आहार’ला अन्नसुरक्षा कायद्याचे कवच
2 निवडणुकीपूर्वी राजकारण्यांची कोंडी
3 दररोज केवळ हेलपाटे!
Just Now!
X