दोन कर्मचाऱ्यांना अटक; दोन वर्षांपासून अपहार
एटीएममध्ये भरायला दिलेली १९ लाखांची रक्कम कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी हडप केल्याचे प्रकरण समोर आले आहे. माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते हा अपहार करत होते.
गोरेगाव येथील सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या कंपनीकडे विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे कंत्राट होते. ही कंपनी मुंबई, ठाणे तसेच पालघरमधील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे भरत असे. या कंपनीत अभिजित बने आणि श्रीकांत गवस हे दोन कर्मचारी काम करत होते. २८ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत कंपनीने वसईच्या आयसीआयसीआय या बँकेच्या एटीएममध्ये भरण्यासाठी २२ लाख रुपये या दोघांना दिले होते; परंतु त्यांनी २२ हजार रुपये कमी भरल्याचे लक्षात आले. त्यांनतर चौकशी केली असता गेल्या दोन वर्षांत या दोघांनी तब्बल १९ लाख २१ हजार रुपयांचा अशा पद्धतीने अपहार केल्याचे समोर आले. कंपनीच्या व्यवस्थापकाने त्वरित माणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क केला. पोलिसांनी तपास करून गवस आणि बने यांना मंगळवारी संध्याकाळी अटक केली. त्यांनी बँकेत भरायला दिलेली रक्कम थोडी-थोडी करून हडप करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कंपनीला संशय येत नव्हता, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत पवार यांनी सांगितले.