घाटकोपरमध्ये दहीहंडींच्या दिवशी फेसबुकवरील पोस्टवरून झालेल्या वादावरून दोन गटांत हाणामारी झाली. येथील असल्फा विभागातील किरण लांडगे आणि सतीश चिकणे या दोन स्थानिकांच्या गटात ही हाणामारी झाली. घाटकोपर पोलीस ठाण्यात उभय पक्षांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घाटकोपर येथे फेसबुक पोस्टवरून झालेल्या वादावादीवरून एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. यात किरण लांडगे यांच्या हातावर तर त्यांचे मित्र आनंद आतकरी यांच्या पोटावर सतीश चिकणे व त्याच्या सहकाऱ्यांनी धारधार शस्त्राने वार केले. विभागातील विकासकामांचा फ्लेक्स फेसबुकवर टाकल्यानंतर हा वाद उफाळून आला. यावेळी किरण लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकार केला असता सतीश चिकणे याच्याही डोक्याला जखम झाली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी लांडगे व त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यचा तपास सुरू असून चिकणे यांच्या सहकाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 2:20 am