‘मरण’ वेचू जाणाऱ्या दोघांना काळमिठी..

 वसई : धावत्या रेल्वेतून बुधवारी मंगळवारी रात्री वसईजवळ एक प्रवासी खाली पडला. ही खबर समजताच त्याला आणण्यासाठी निघालेल्या दोन हमालांना काही क्षणांत आपणही काळमिठीत सापडणार आहोत, हे जाणवलेही नव्हते. पण स्ट्रेचरवरून त्या प्रवाशाला आणताना मागून वेगाने आलेल्या उपनगरी गाडीचा धक्का बसून हरिराम राजभर (वय ४०) आणि रामशास्त्री पासवान (५०) हे दोन हमाल ठार झाले, तर तो प्रवासीही रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित झाला.

वसई आणि नायगाव स्थानकांच्या दरम्यान मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास उपनगरी गाडीतून पंगतीराज नायडू हे ६५ वर्षांचे वृद्ध पडल्याची खबर वसई स्टेशन मास्तरांकडे आली. त्यानंतर चौघा हमालांसह स्टेशन मास्तर मनोज चव्हाण घटनास्थळी गेले. जखमी नायडू यांना स्ट्रेचरवरून क्रमांक एकच्या फलाटावर आणले जात असतानाच मागून वेगाने उपनगरी गाडी आली. गाडी येत असल्याचे पाहाताच दोन हमालांनी रेल्वेरुळाबाजूच्या नाल्यात उडी घेतली, मात्र या दोघंना जीव वाचवता आला नाही. स्टेशनमास्तर चव्हाण हे गंभीर जखमी झाले. नायडू यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. स्टेशन मास्तरांनी योग्य सूचना न दिल्याने हा अपघात झाल्याचा आरोप अन्य हमालांनी केला आहे. मृत्युमुखी पडलेले हमाल गेल्या ४० वर्षांपासून येथे काम करत होते, असे वसई रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी सांगितले.