पुरातत्त्व विभागाकडून कारवाई होत नसल्याने दुर्गप्रेमींमध्ये नाराजी

चिमाजी अप्पांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेल्या ऐतिहासिक वसई किल्ल्याच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे होऊ लागली आहेत. त्यामुळे किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासाला धोका निर्माण झाला आहे. या अनधिकृत बांधकामाविरोधात कुठलीच कारवाई होत नसल्याने दुर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

वसई किल्लय़ात सध्या अनेक सोईची बांधकामे व अनधिकृत घरे, झोपडय़ा यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. या बांधकामात मौनीबाबा झोपडी, कस्टम बांधकाम, हनुमान मंदिरासमोरील नवोदित घरे, चिमाजी स्मारकातील झोपडय़ा इत्यादी बऱ्याच वास्तुंचा समावेश आहे. किल्लय़ातील अनेक वास्तुंभोवती झोपडय़ा, दुकाने थाटण्यात आली आहेत. यावर योग्य ती कारवाई न केल्याने चक्क किल्लय़ाच्या प्रवेशद्वारातच झोपडय़ा उभ्या राहिल्या असून आता तिथे पक्कय़ा घरांचे काम सुरू आहे, तर  हनुमान मंदिरासमोरील घरांची संख्या सहावर पोहोचली आहे.

या अनधिकृत बांधकामात राहणारे काही लोक इतरांकडून चक्क भाडेही वसूल करत असल्याचा आरोप इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी केला आहे. याबाबत वसई किल्लय़ाची काळजी, देखभाल करणाऱ्या विभागास विचारणा केली असता त्या बांधकामाचा कालावधी किंवा त्यांनी पाठवलेल्या नोटिसा दाखवल्या जातात. पुरातत्त्व विभागाने या जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर आणि तिथे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे, नाहीतर या ऐतिहासिक ठेव्यास बाधा पोहोचेल, असे राऊत यांनी सांगितले.

पुरातत्व विभागाचे वसई किल्ला येथील अधिकारी कैलास शिंदे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तसेच किल्ल्यातील या विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा

प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आणि शिंदे यांच्याकडूनच याबाबत माहिती घेण्यास सांगितले.