नवरात्रीनिमित्त भाजपकडून अनधिकृत फलकबाजी; पालिका प्रशासनाकडून कारवाई

१ ऑक्टोबरपासून मीरा-भाईंदर शहरात फलकबंदी घोषित करण्यात आली असतानाच सत्ताधारी भाजपने स्वत:च या निर्णयाला हरताळ फासला आहे. नवरात्रीनिमित्त भाजपकडून एका गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या उत्सवात सहभागी होणाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यालगतच भलामोठा फलक लावण्यात आला. या फलकावर आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांची छायाचित्रे लावण्यात आली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम खासगी असतानाही या फलकावर महापालिकेचे बोधचिन्ह लावण्यात आले असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र या फलकाविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर महापालिकेने कारवाई करून हा फलक उतरवला.

शहर फलकमुक्त व्हावे यासाठी १ ऑक्टोबरपासून फलक लावण्यासाठी परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. केवळ महापालिकेने उभ्या केलेल्या अधिकृत होर्डिग्जवर जाहिरात करण्याची परवानगी आहे. मुख्य म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी भाजपनेच पुढाकार घेतला होता. १ ऑक्टोबरपासून महापालिकेने अनधिकृत फलकांविरोधात सुरू केलेल्या कारवाईतही भाजपचे आमदार, महापौर आणि इतर नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता.

असे असताना भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यालगतच भलामोठा फलक लावण्यात आला. या फलकावर स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि महापौर डिंपल मेहता यांची छायाचित्रे झळकत होती. या फलकावर भाजपचे नाव नसले तरी भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ दिमाखात झळकत होते, शिवाय त्याच्याच शेजारी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे बोधचिन्हही लावण्यात आले होते. त्यामुळे हा फलक वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नवरात्रीत फलकबंदी शिथील करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी भाजपने केली  होती. मात्र त्यावर आयुक्तांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पालिकेने फलक हटवला

भाजपच्या या फलकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख दादासाहेब खेत्रे यांनी दिली. सायंकाळी महापालिकेचे प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी आयोजकांना समज देऊन हा फलक उतरवला. १ ऑक्टोबरनंतर अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. या पाश्र्वभूमीवर यावर पालिका काय कारवाई करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत फलकबाजीविरोधात भाजपने महापलिका प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. उत्सव मंडळांना मंडप परिसरात फलक लावण्यास परवानगी मिळावी, अशी भाजपची भूमिका आहे. त्यानुसार लावण्यात आलेला फलक मंडप परिसरातच लावण्यात आला त्याव्यतिरिक्त इतरत्र कुठेही फलक लावण्यात आलेले नाहीत.

– ध्रुवकिशोर पाटील, भाजपचे वरिष्ठ नगरसेवक