पावसामुळे कामाचा सुमार दर्जा उघड

भाईंदर : अवकाळी पावसाची हजेरी लागताच मीरा-भाईंदरमधील रस्त्यांवर खड्डय़ांचे दणके नागरिकांना सहन करावे लागले. पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम केल्यानंतर देखील पुन्हा खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाविषयी प्रश्न विचारले जात आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे मीरा-भाईंदर शहारत पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी जोरात पाऊस पडल्यामुळे शहरातील काही भागात पाणी साचले. मात्र या पाण्यामुळे काही भागातील रस्त्यांना चक्क खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले. यात सिल्वर पार्क, सुष्टी परिसर आणि भक्ती वेदांत रुग्णालयाचा प्रामुख्याने समावेश आहे.

धक्कादायक बाब म्हणजे पावसाळा संपल्यानंतर पालिका प्रशासनाकडून शहरातील खड्डे बुजवण्याकरिता लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम निष्कृष्ट पद्धतीने झाल्यामुळे पुन्हा रस्त्यावर खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या खड्डय़ात साठत असलेल्या पाण्यामुळे डासांची समस्या निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न समाजमाध्यमांवर विचारण्यात येत आहे.

रस्त्याच्या कामात घोळ करण्यात येत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्षपणा करण्यात येत असून त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

– दिलीप भाबड, समाजसेवक

रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे त्या भागात थोडय़ा प्रमाणात पाणी साचले.

– यतीन जाधव, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग