|| प्रसेनजीत इंगळे

वसई-विरार शहरात एकीकडे भेसळयुक्त पदार्थ तयार करणारे विनापरवाना कारखाने उघडकीस येत असताना दुसरीकडे हॉटेलांमध्ये वापरलेले तेल पुन्हा पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेते, तसेच छोटय़ा हॉटेलांमध्ये वापरले जात असल्याचे उघडकीस आले आहे. मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण देत अन्न व औषध प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वसई-विरार शहर सध्या भेसळखोरांची नगरी बनत चालली आहे. मिठाई, मावा, पाणीपुरी, पनीर, दही-दूध तसेच रासायनिक पद्धतीने पिकवलेली फळे, कमी दर्जाचा किराणा माल, वैधता संपलेल्या वस्तू असे अनेक प्रकार समोर येत आहे. आता त्यात काळ्या तेलाची भर पडली आहे. काळे तेल वापरून वसई विरार अनेक खाद्यजिन्नसा बनविल्या जात आहेत. तर अनेक पदार्थाच्या हातगाडय़ांवर हे तेल सर्रास तळणासाठी वापरले जात आहे. यामुळे वसईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

हॉटेलांमध्ये तळण्यासाठी तेल वापरले जाते. ते वापरलेले तेल म्हणजे काळे तेल. हे तेल भारतीय खाद्यसुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी घालून दिलेल्या नियमानुसार केवळ तीनदा वापरता येते. पण हॉटेल मालक हे तेल सात ते आठ वेळा वापरले जाते.  हे  तेल शासनमान्य वितरकाला विकत देणे बंधनकारक आहे. या तेलावर प्रक्रिया करून त्यापासून जैवइंधन बनविण्यात येते.

या तेलाचा दर १० ते १५ रुपये किलो प्रमाणे ठरवून दिला आहे. पण वसई-विरारमधील हॉटेल मालक अधिक आर्थिक नफा मिळविण्यासाठी हे तेल २० ते ३० रुपये दराने खासगी विRेत्यांना विकत असतात. खासगी वितरक हेच तेल ४० ते ५० रुपये दराने हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना तसेच छोटय़ा  हॉटेलमालकांना आणि फरसाण आणि तळलेले खाद्यपदार्थ बनविणाऱ्या  व्यापाऱ्यांना विकतात.

वसई विरार मध्ये चार हजारांहून अधिक हॉटेले आहेत. त्यातील केवळ ६०० हॉटेलांची नोंदणी आहे. बाकी हॉटेल कोणतेही परवाने न घेता राजरोस सुरू आहेत. या हॉटेलमधून रोज हजारो लिटर वापरातील तेल निघते. हे तेल साखळी पद्धतीने सर्रास विकले जात असून हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थ बनविणारे आणि फरसाणवाले या तेलाचा वापर करतात.

‘स्वतंत्र विभाग नसल्याने कारवाई नाही’

वसई-विरार शहरासाठी अन्न व औषध प्रशासनाचा स्वतंत्र विभाग नाही. त्यामुळे यावर कारवाई होत नाही. काळे तेल वापरासंदर्भात शासनाचे र्निबध आले आहेत, त्यातही छोटय़ा व्यवसायिकांसाठी कोणतेही धोरण नाही. तेल वापराचा विषय गंभीर आहे, मनुष्यबळ कमी असल्याने सर्वच ठिकाणी कारवाई करणे आवश्यक आहे. आम्ही यावर कारवाईचे नियोजन करीत आहोत, तसेच जनजागृती कार्यक्रमाची आखणीही करीत आहोत. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली.

हृदयविकाराचा धोका

नालासोपारा धानीव, पेल्हार, हनुमान नगर, टाकीचा पाडा, शर्मा कंपाउंड, संतोष भुवन, वसई महामार्गाजवळील अनेक वस्त्यांत खाद्यपदार्थ बनवणारे कारखाने आहेत.त्यांमध्ये काळे तेल तळणपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाते.  या तेलामुळे कर्करोग, हृदय विकार, आणि पचनाचे अनेक विकार जडण्याची शक्यता असते.