कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींच्या तुटवड्यामुळे बुधवारी पालिकेच्या एकाच केंद्रावर  लसीकरण सुरू राहणार आहे.  याठिकाणी नोंदणीकृत नागरिकांनाच दुसरी मात्रा  देण्यात येणार आहे. शहरातील उर्वरित लसीकरण केंद्रे बंद राहतील, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे. या केंद्रावर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींची पहिली आणि दुसरी मात्रा नागरिकांना देण्यात येते. मात्र, सध्या लसीचा अपुरा साठा असल्यामुळे लोढा लक्झरीया येथील पालिकेच्या पोस्ट कोविड केंद्रामध्येच बुधवारी लसीकरण सुरू राहणार आहे. याठिकाणी आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांनाच कोव्हॅक्सिन लसीची दुसरी मात्रा  देण्यात येणार आहे.   शहरातील ज्या खासगी रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे, त्या ठिकाणी लसीच्या उपलब्धेनुसार बुधवारी लसीकरण केले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.