बालदिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ‘बाल दिशा’ असे सूचक शीर्षक या प्रदर्शनाला दिले जाणार आहे. नमन तलरेजा, रेया गोरवारा, पलाश गाला, वृषभ जैन या बालचित्रकारांची चित्रे यात पाहायला मिळतील. वास्तववादी निसर्गचित्रे, कॅनव्हासवर सुपरग्लू रंग वापरून निसर्गसौंदर्याचे दर्शन घडविणारी चित्रे, जलरंग आणि पेस्टलमधील चित्रे, कागदावर चारकोल माध्यमातील चित्रे अशी विविधता चित्रांमध्ये पाहायला मिळेल.
’१७ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७
’नेहरू सेंटर कला दालन, डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्ग, वरळी

‘अनुभूती’
राजेंद्र ढवळे हे पुण्यातील कला महाविद्यालयात शिकविणारे शिक्षक असून त्यांची चित्रे आणि शिल्पकृतींचे प्रदर्शन ‘अनुभूती’ हे पुढील आठवडय़ात भरविण्यात येणार आहे. कॅनव्हासवरची चित्रे आणि फायबर, ब्राँझ, लाकूड यांचा वापर करून तयार केलेल्या शिल्पकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतील. विविध भावभावनांचे प्रकटीकरण आणि त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न ढवळे यांनी या प्रदर्शनातील कलाकृतींमधून केला आहे. सर ज जी कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.
’जहांगीर कला दालन, काळा घोडा
’१० ते १६ नोव्हेंबरदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७

विनोद शर्मा यांची चित्रे
विविधरंगी निसर्गचित्रे हे विनोद शर्मा यांच्या शैलीचे वैशिष्टय़ आहे. निसर्गचित्रे वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी चितारली आहेत. उत्स्फूर्तता, भावनिक उत्कटता आणि त्याचा चित्रांत विविधरंगी वापर अशी ही चित्रे आहेत.
’१७ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७
’जहांगीर कला दालन, काळा घोडा

वेदाक्षरे
सुलेखनकार राम कस्तुरे यांच्या अक्षरलेखनाच्या कलाकृतींचे प्रदर्शन ‘वेदाक्षरे’मध्ये अक्षरांची कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमातील किमया पाहण्याची संधी चित्रप्रेमींना, सुलेखन  कलाप्रेमींना मिळणार आहे. ओम, अक्षर गणेश या कलाकृतींबरोबर अमूर्त शैलीतील कलाकृतीही या प्रदर्शनात पाहायला मिळतील. वैदिक ऋचांचा गर्भित अर्थ समजावून घेऊन त्याचे दृश्यरूपात सुलेखन कलाकृतींद्वारे मांडण्याचा प्रयत्न कस्तुरे यांनी या प्रदर्शनातील कलाकृतींमधून केला आहे.
’११ ते १७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७
’ऐरावत कला दालन, २९, बाळ कृष्ण निवास, लखमशी नप्पू मार्ग, वेलिंगकर मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटनजीक, माटुंगा (मध्य रेल्वे).

आज बालदिनी पुस्तक प्रकाशन
चित्रपतंग प्रकाशनातर्फे बच्चेकंपनीसाठीच्या द्वैभाषिक पुस्तकांचे प्रकाशन बालदिनी १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ‘आय हेट कलिरग बुक’ हे द्वैभाषिक कृतिसंवादी प्रकारातील पहिल्या भारतीय पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केले जाणार आहे. संगीतकार कौशल इनामदार, आमदार कपिल पाटील, शिव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान, पोमेनेग्रेट वर्कशॉपच्या प्रिया श्रीनिवासन, चित्रपतंगच्या प्राची आगवणे यांच्या उपस्थितीत प्रकाशन केले जाणार आहे.
’शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता
’डी. एस. हायस्कूल, गुरुकृपा हॉटेलशेजारी, सायन

दीपावली संगीत मैफल
दीपावलीनिमित्त ‘कलाभारती’तर्फे विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात येत आहे. इंदूरच्या शास्त्रीय गायिका शोभा चौधरी यांचे गाणे ऐकण्याची संधी मिळणार आहे. माधवराव जोशी, पं. सी. आर. व्यास तसेच बाळासाहेब पुछावाले, ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. वामनराव राजुरकर यांसारख्या दिग्गजांकडून शोभा चौधरी यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे. ख्याल गायकी आणि निरनिराळ्या घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली आहे. त्यांना तबल्यावर अभय दातार आणि हार्मोनियमवर रवींद्र लोमटे हे कलावंत साथसंगत करणार आहेत. रसिकांसाठी मैफलीला विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.
’कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा पश्चिम रेल्वे
’रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता

ज. जी. समूह  रुग्णालय परिसरात दीपावली महोत्सव
भायखळा येथील ज. जी. समूह रुग्णालय परिसरातील सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी मंडळातर्फे यंदाही येथील कामगार वसाहतीत १५ व १६ नोव्हेंबर असे दोन दिवस दीपावली आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातील कसाल येथील श्री लिंग रामेश्वर दशावतार नाटय़ मंडळाचा ‘कुलांगार’ हा नाटय़प्रयोग व सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी ‘सोनपावले लोककलेची’ हा मराठी वाद्यवृंद आयोजित केला आहे. हा कार्यक्रम दैवत रंगमंच, सुभाष मैदान, सर ज. जी. समूह रुग्णालय परिसर, भायखळा येथे रात्रो ८ वाजता सुरू होईल.