चिमणीअभावी परिसरात सर्वत्र धूर; विकासासाठीच्या लाखो रुपयांचा चुराडा

वसई-विरार शहरात असलेल्या स्मशानभूमींना अक्षरश: मरणकळा लागलेली आहे. या स्मशानभूमींमध्ये चिमणी नसल्याने नागरिकांना धुराचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीत बसायला बाके नाहीत, अनेक ठिकाणी मोडतोड झाली आहे. स्मशानभूमीच्या विकासासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येत असले तरी ही दुरवस्था असल्याने या पैशांचे काय झाले, असा सवाल उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्मशानभूमींची पाहणी करून दुरुस्तीचे तसेच चिमण्या बसविण्याचे आदेश दिले आहेत.

वसई-विरार शहरात पूर्वी चार नगरपरिषदा होत्या. लोकसंख्या कमी असल्याने त्या वेळी स्मशानभूमी शहरापासून दूर, निर्मनुष्य ठिकाणी होत्या; परंतु वाढत्या शहरीकरणामुळे स्मशानभूमीजवळच्या परिसरात वस्त्या होऊ लागल्या. आज निवासी इमारतींच्या मधोमध स्मशानभूमी उभ्या राहिल्या आहेत; परंतु पालिकेने या स्मशानभूमीची नीट उभारणी न केल्याने त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसत आहेत. अनेक स्मशानभूमींमध्ये धूर जाण्यासाठी चिमण्या बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे तेथून निघणारा धूर व राख ही परिसरातल्या इमारतींत जात असते. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

नव्या स्मशानभूमीतही चिमणी नाही!

वसईच्या दिवणामन येथीत जुन्या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले. ८० लाख रुपये खर्चून या ठिकाणी नवीन स्मशानभूमी  विकसित करण्यात आली; परंतु तेथे चिमणी बसविण्यात आलेली नाही. जी गोष्ट अत्यंत आवश्यक आहे, तीच जर स्मशानभूमीत नसेल तर लाखो रुपये खर्च करून काय फायदा, असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. धुरामुळे येथील नागरिकांना त्रास होत आहे. खास डिझाइन बनवून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्याचे भान का नाही, असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आयुक्तांकडून दखल

पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी याची गंभीर दखल घेतली. सोमवारी त्यांनी दिवाणमान आणि विरारमधील स्मशनाभूमींची पाहणी केली. या स्मशानभूमींमध्ये अनेक अत्यावश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ या सर्व स्मशानभूमींची दुरुस्ती करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.