नामांकित सराफांची दुकाने बंद पाडली
देशभरासह सर्वत्र सराफांनी बंद पुकारलेला असताना गुढीपाडव्याच्या दिवशी वसईतल्या काही नामांकित सराफांनी आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर सराफांनी तो हाणून पाडला. जोपर्यंत केंद्र सरकारकडून मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे, अशी भूमिका सराफांनी घेतली आणि कुणालाही दुकान उघडण्यास मुभा नसल्याचे ठणकावून सांगितले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सराफांचा जोर पाहून मग ही दुकाने बंद करण्यात आली.
केंद्र सरकारने सराफांच्या व्यवसायावर लावलेला अबकारी कर रद्द करावा आणि अन्य काही मागण्यांसाठी देशभरातील सराफांनी बेमुदत संप पुकारला आहे. गुढीपाडवा हा सोने खरेदीचा शुभमुहूर्त मानला जातो. या दिवशी मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी केली जाते; परंतु त्या मोहाला बळी न पडता सराफांनी दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वसईत त्रिभुवनदास भीमजी ज्वेलर्स, वामन हरी पेठे, तनिष्क आदी नामांकित ब्रॅण्डने संपाकडे दुर्लक्ष करत आपली दुकाने सुरू ठेवली होती. ते समजताच वसईतल्या अन्य सराफांनी या दुकानांवर धडक देऊन दुकाने बंद करण्यास भाग पाडले. आम्ही आमचे नुकसान सहन करून दुकाने बंद ठेवली आहेत. मग तुम्ही दुकाने का सुरू ठेवली, असा त्यांना जाब विचारला. या वेळी सराफांनी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर या मोठय़ा दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवली. वसईत दोन असोसिएशन्स आहेत. त्यांच्यात मतभिन्नता होती. परंतु सर्व सराफांच्या हितासाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तरीही या मोठय़ा दुकानदारांनी दुकाने सुरू ठेवून फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता, असे वीरेंद्र जैन या सराफाने सांगितले.
ही दुकाने पुन्हा उघडू नये यासाठी सराफांनी दुकानाच्या बाहेर मोर्चेबांधणी करून ठिय्या मांडला होता. दुकानाच्या बाहेर सराफ क्रिकेट खेळत होते. परंतु त्यांनतर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

पालघर जिल्ह्यात १,८२० सराफांची लहान-मोठी दुकाने आहेत, तर वसई-विरार शहरात २४० सराफांची दुकाने आहेत. त्या सर्वानी संपात भाग घेतला. आम्ही केवळ या मोठय़ा सराफांच्या दुकानदारांना विनंती केली आणि त्यांनी दुकाने बंद ठेवली.
– पुरुषोत्तम पाटील-पवार, अध्यक्ष, वसई तालुका ज्वेलर्स असोसिएशन.

गुढीपाडव्यात सोने खरेदी केली जाते. पण आम्ही नुकसान सहन करून आजच्या दिवशीही दुकान खुले न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्हाला कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. देशभरात पाच कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका या संपामुळे बसला आहे.
– भवर मेहता, महाराष्ट्र ज्वेलर्स असोसिएशन.