महापौर मॅरेथॉनमध्ये १४ हजार स्पर्धकांचा सहभाग; ललिता बाबर, खेताराम, अभिनेत्री गुल पनाग यांचा समावेश

वसई विरार महापालिकेतर्फे ११ डिसेंबरला राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धा होणार असून पालिकेकडून त्याची जोरात तयारी सुरू आहे. यंदाच्या राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेत देशभरातील तब्बल १४ हजार स्पर्धक सहभागी होणार असून यात नावलौकिक असलेले सुमारे ५० हून अधिक नामांकित खेळाडूदेखील सहभागी होणार आहेत. ‘क्लीन वसई.ग्रीन वसई’ हे ब्रीदवाक्य घेऊन येत्या ११ डिसेंबर रोजी अवघे वसई-विरार धावणार असून भारताची स्टार धावपटू ललिता बाबर, खेताराम आणि प्रसिद्ध अभिनेत्री गुल पनाग हे स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे.

महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे सहावे वर्ष आहे. महिनाभर या मॅरेथॉनची तयारी करण्यात येते. आता मॅरेथॉनला काही दिवस उरल्याने त्याच्या तयारीला वेग आला आहे. रस्त्यांची डागडुजी व आवश्यक परवानग्यांची कामेही पूर्ण झाल्याची माहिती महापौर कार्यालयातून देण्यात आली आहे. ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा विरार पश्चिमेतील नवीन विवा महाविद्यालयाजवळून सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. तर २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन स्पर्धा सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. धावपटूंना स्पर्धेदरम्यान धावण्यासाठी कोणताही त्रास होऊ  नये यासाठी रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. यंदाच्या या मॅरेथॉन स्पर्धेत प्रसिद्ध धावपटू कविता राऊत हिच्यासह देशभरातील सुमारे ५०हून अधिक नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे रिओ ऑलिम्पिकमधील ३ ते ४ खेळाडूंनादेखील आमंत्रित करण्यात येणार आहे.

  • यंदा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या बुटांना टाइप चिप लावण्यात येणार आहे.
  • ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या विजेत्या स्पर्धकाला अडीच लाख रुपयांचे बक्षीस आहे.
  • २१ किलोमीटरची अर्धमॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला १ लाख २५ हजाराचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

नामांकित धावपटूंचा सहभाग

यंदाच्या या मॅरेथॉन स्पर्धेत प्रसिद्ध धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, इलाम सिंग, किरण तिवारी, संदीप कुमार, निनिंग लिंगसोई, आशीष सिंग चौहान, सुप्रिया पाटील यांच्यासह देशभरातील सुमारे ५०हून अधिक नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत.