25 February 2021

News Flash

वसईकरांचे मेट्रोचे स्वप्न लांबणीवर

वसई-विरार शहराची लोकसंख्या २० लाखांहून अधिक झालेली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रकल्प अहवाल तयार करायलाच आणखी दीड वर्षांचा कालावधी

वसई-विरारकरांना राजकारण्यांनी मेट्रोचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात मेट्रोचे काम सुरू होण्यासाठी आणखी दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करणे, त्याला मंजुरी मिळवणे आणि निधीची तरदूत करणे या कामांसाठी हा विलंब लागणार आहे. त्यानंतरही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने वसईकरांना मेट्रोचे स्वप्न तूर्तास तरी लवकर शक्य नाही.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २० लाखांहून अधिक झालेली आहे. वसईतून लाखो प्रवासी दररोज कामानिमित्त मुंबईला ये-जा करत असतात. मात्र ट्रेनच्या जीवघेण्या गर्दीमुळे अनेक अपघात होत असतात. त्यासाठी वसई-विरार शहरात मेट्रोची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दहिसपर्यंत येणारी मेट्रो विरापर्यंत नेण्याची घोषणा केली होती. यामुळे वसईकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मीरा-भाईंदर मेट्रोचे काम डिसेंबर २०१८ मध्ये सुरू होत आहे, परंतु वसईतील मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यासाठी अजून किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प संचालक प्रवीण दराडे यांनी दिली.

विलंब का?

वसई-विरापर्यंत मेट्रो कशी येऊ  शकते, कोणता मार्ग व्यवहार्य आहे, या मेट्रो प्रकल्पासाठी किती खर्च येईल याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम एमएमआरडीएला करायचे आहे. वसई-विरापर्यंत मेट्रो आणण्यासाठी त्याचा मार्ग कसा असावा,  हा प्रकल्प केल्यास किती खर्च येईल, किती स्थानके असावीत याबाबत एकूणच बारकाईने अभ्यास करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच ‘डीपीआर’ बनवण्याचे काम एमएमआरडीएने ‘दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन’ला दिले आहे. हा अहवाल बनायला साधारण एक वर्षांचा कालावधी लागेल, असे दराडे यांनी सांगितले. हा डीपीआर तयार होऊन आल्यानंतर त्याला एमएमआरडीए आणि राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागेल, या प्रकल्पासाठी कर्जरूपाने निधी उभा करावा लागेल. त्यांनतर मेट्रो मार्गावर प्रत्यक्षात भूसंपादन करावे लागेल. अशी बरीच मोठी प्रक्रिया अजून होणे बाकी आहे, त्यामुळे विलंब लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रो अशी जाणार..

वसईत मेट्रो कुठून आणणार ते अद्याप निश्चित झालेले नाही. भाईंदर पश्चिमेपर्यंत प्रस्तावित असलेली मेट्रो पुढे नायगाव खाडीवरून (या खाडीवर नव्याने एमएमआरडीए जो केबल ब्रीज बांधणार आहे त्यावरून) वसई महापालिकेच्या हद्दीत आणून ती मेट्रो विरापर्यंत नेण्यात येईल किंवा महामार्गावरून घोडबंदर मार्गेही वसईत मेट्रो आणण्याचा विचार होऊ  शकतो. दोन्ही ठिकाणी खाडीवर मोठे पूल यासाठी एमएमआरडीएला बांधावे लागणार आहेत. त्यासाठी हजारो कोटींचा खर्च येईल. सविस्तर प्रकल्प अहवाल त्यानुसार तयार केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:25 am

Web Title: vasikars metro dream prolonged
Next Stories
1 ‘आमचो कोळीवाडो’ भस्मसात
2 ‘फेसबुक मित्रा’कडून लाखोंची फसवणूक
3 रिक्षा तंदुरुस्त चाचणीसाठी नेरूळवारी
Just Now!
X