आवक कमी असल्याने दरांमध्ये वाढ; डाळी, कडधान्यांनाही महागाईचे ग्रहण

राज्यात पावसाचा मुक्काम लांबल्याचा परिणाम बाजारपेठेवर स्पष्ट दिसून येत असून गेल्या महिनाभरापासून चढणीला लागलेले भाज्या व धान्याचे भाव अजूनही कमी झालेले नाहीत. गेल्या दोन आठवडय़ांपासून वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी बाजारात कृषी मालाची आवक ३० ते ४० टक्क्यांनी रोडावली आहे. त्यामुळे घाऊक दर वाढताच किरकोळ बाजारात प्रमुख भाज्यांचे दर किलोमागे ५ ते ३५ रुपयांनी वाढले आहेत. कांद्यांच्या दरात प्रति किलोमागे १० रुपयाने वाढ झाली असून जवळपास सर्वच प्रमुख डाळींनी शंभरी गाठली आहे.

पावसाळा संपताच साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून शहरी भागास कृषीमालाचा उत्तम पुरवठा सुरू होतो असा अनुभव आहे. हवामानातील बदलांमुळे यंदा हे गणित पूर्णपणे बदलले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश झोडपून काढले. परिणामी, ग्रामीण भागातील शेतात पिकवल्या जाणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महिनाभरापूर्वी वाशी कृषी उत्पन्न बाजारपेठेत भाज्यांच्या दररोज ७०० गाडय़ा दाखल होत होत्या. गेल्या दोन आठवडय़ांपासून ४०० ते ५०० गाडय़ा दाखल होत आहेत, अशी माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमार्केट विभागाचे सहसचिव आर. के. राठोड यांनी दिली.

घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात ५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, किरकोळ बाजारात ५ ते ३५ रुपयांनी वाढ झाली आहे. परिणामी, ग्राहकांना महागलेल्या भाज्या विकत घेताना आर्थिक चणचण जाणवू लागल्याचे पहायला मिळत आहे. पुढील १० ते १५ दिवस भाज्यांच्या दरातील वाढ कायम राहणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

कडधान्येही महाग

अवकाळी पावसाचा फटका हा कडधान्य उत्पादनालाही बसल्याचे पाहायला मिळत आहे. कडधान्याच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. चवळी, मूग, मटकी, वाल, हरभरा या कडधान्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी किरकोळ बाजारात ६० रुपये किलोने मिळणारी चवळी सध्या ८० रुपये किलोने मिळत आहे. तर ७० रुपये किलोने मिळणारे मूग सध्या ८० रुपये किलोने मिळत आहे. ९० रुपये किलोने मिळणारी मटकी ग्राहकांना सद्यस्थितीला ११० रुपयांनी विकत घ्यावी लागत आहे. तर ८० रुपये किलोने मिळणारे वाल सध्या १०० रुपये किलोने मिळत आहे. तर हरभऱ्याच्या दरातही वाढ झाली असून ८० रुपये किलोने मिळणारा हरभरा ग्राहकांना १०० रुपये किलोने विकत घ्यावी लागत आहे.

कांदा महागच

परतीच्या पावसाचा मोठा फटका कांद्यालादेखील बसला असून कांद्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एक महिन्यांपूर्वी दररोज कांद्याच्या १२० ते १५० गाडय़ा दाखल होत होत्या. परंतु सद्यस्थितीला केवळ ८० ते १०० गाडय़ा बाजारात दाखल होत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा बटाटा विभागाचे अधिकारी के. आर. पवार यांनी दिली आहे. घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा ५४ रुपये किलोने मिळत आहे. तर किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

पावसामुळे भाज्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली असून त्यांच्या दरातही वाढ झाली आहे. हे दर स्थिर व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत.

 – रमेश वर्मा, किरकोळ भाजी विक्रेते, ठाणे.