महापालिकेकडून पैसे मिळत नसल्यामुळे संस्थेचा निर्णय

ठाणे : शहरातील २० ठिकाणी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमाद्वारे महापालिका खासगी संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना विनामुल्य आरोग्य सुविधा देत आहे. शिवसेना आणि महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या सहा महिन्यांत महापालिकेकडून एक रुपयाचेही देयक अदा करण्यात आलेले नसल्यामुळे संबंधित संस्थेने शुक्रवारपासून दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे करोना काळात नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २६ लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरात ५२ टक्के नागरिक झोपडी आणि चाळीमध्ये राहत आहेत. आरोग्य निकषांनुसार प्रत्येक ३० ते ४० हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक असताना शहरात केवळ २७ आरोग्य केंद्र आहेत. त्यामुळे एक ते दीड लाख लोकसंख्येचा भार एका आरोग्य केंद्रावर पडतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांना घराजवळच विनामुल्य आरोग्यसुविधा मिळावी, या उद्देशातून महापालिकेने शहरात ५० ठिकाणी आपला दवाखाना उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे कंत्राट ‘मेडऑनगोस आपला दवाखाना’ या संस्थेला देण्यात आले. या संस्थेला प्रत्येक रुग्णामागे दीडशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संस्थेने ‘वन रूपी क्लिनिक’ संस्थेशी भागीदारी करून त्यांच्या माध्यमातून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात शहरात २० ठिकाणी दवाखाने सुरु केले.

या उपक्रमासाठी पाच वर्षांकरिता पालिकेने १६० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. या उपक्रमात गेल्या सहा महिन्यात ६९ हजार नागरिकांना विनामुल्य आरोग्य सुविधा देण्यात आली आहे. संबंधित संस्थेने शुक्रवारपासून अचानकपणे सर्वच दवाखाने बंद केले आहेत. या संदर्भात वन रूपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. गेल्या सहा महिन्यांच्या कामाचे पैसे संबंधित संस्थेकडून मिळालेले नाही. तरीही आम्ही सहा महिने दवाखाने चालविले. आता पैशांअभावी हा उपक्रम सुरु ठेवणे शक्य नसल्यामुळे दवाखाने बंद केल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे शहरात वन रुपी क्लिनिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून आपला दवाखाना उपक्रम राबवित आहोत. या उपक्रमासाठी महापालिकेकडून निश्चिात करण्यात आलेले पैस अद्याप मिळालेले नाहीत. कोणतीही कंपनी पैशाविना काम करू शकत नाही.  या उपक्रमातील डॉक्टर, आरोग्य सेवक आणि दवाखान्यांच्या जागेचे भाडे हा खर्च करणे शक्य होत नसल्यामुळे संबंधित संस्थेने तात्पुरते दवाखाने बंद केले आहेत. कायमस्वरुपी हे दवाखाने बंद केलेले नसून आम्ही देयक मिळण्याची वाट पाहत आहोत.

अॅड. जसीम शेख,  कायदेविषयक राज्य प्रमुख, मेडऑनगोस आपला दवाखाना संस्था

आपला दवाखाना या उपक्रमाचे देयक नेमके कशामुळे थकले, हे तपासून संबंधित संस्थेला कामाचे देयक अदा करण्यात येईल. या उपक्रमातील दवाखाने पुर्वीप्रमाणे सुरु करण्यात येतील.

डॉ. वैयजंती देवगेकर, मुख्य आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिका 

या उपक्रमाद्वारे संबंधित संस्था शहरात आरोग्य सुविधा देण्याचे चांगले काम करीत आहे. संबंधित संस्था आणि प्रशासनाची सोमवारी तातडीने बैठक घेण्यात येईल आणि त्यामध्ये या संस्थेची समस्या दूर करण्यात येईल. तसेच हा उपक्रम पुर्वीप्रमाणे शहरात सुरु होईल.

नरेश म्हस्के, महापौर, ठाणे