रस्ता सुरक्षा अभियानाचा भाग म्हणून ठाण्यातील रस्त्यांवर रविवारी दुर्मीळ गाडय़ांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीतील दुर्मीळ गाडय़ा पाहण्यासाठी ठाणेकरांची गर्दी झाली होती. कोपरी येथील आनंदनगर जकातनाका ते रेमंड मिल कंपाऊंड अशी २१ किलोमीटरवर ही रॅली समाप्त झाली.

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्ताने ठाणे वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, रेमंड लिमिटेड आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील रेमंड मिल कंपाऊंडमध्ये दुर्मीळ कार आणि दुचाकीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या अभियानाचा एक भाग म्हणून दुर्मीळ कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोपरी येथील आनंदनगर जकातनाका येथून या रॅलीला सुरुवात झाली. १९६२ ते २०१२ पर्यंतच्या एकूण ३२ दुर्मीळ कार यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यात बिटल, सुपर बिटल, बग्गी, नवी बिटल, कारमन्न घिया आणि लाल पांढऱ्या बसचा समावेश होता. ही रॅली कोपरी, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन, पोखरण रस्ता क्रमांक १, येऊर प्रवेशद्वार, पवारनगर रस्ता, टिकूजीनी वाडी सर्कल, मानपाडा चौक, पातलीपाडा, तुलसीधाम, लोकपुरम, वसंतविहार सर्कल, देवदयानगर सर्कल, शास्त्रीनगर, वर्तकनगर नाका आणि त्यानंतर रेमंड मिल कंपाऊंडपर्यंत निघाली.

ठाणेकरांनी रस्त्यावर पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार पाहिल्यामुळे नागरिकांनी या कारची छायाचित्रे टिपण्यासाठी मोबाइल कॅमेरे उंचावले होते. या रॅलीच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालवण्याचे संदेश ठाणेकरांना दिले जात होते. रॅलीमध्ये ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशन तसेच विण्टेज आणि क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा हे देखील सहभागी झाले होते.

गर्दी.. : ठाणेकरांनी रॅलीप्रमाणे प्रदर्शन पाहण्यासाठीही गर्दी केली. रेमंड मिल कंपाऊंडमध्ये ६९ गाडय़ांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये ३९ कार तसेच ३० दुचाकींचा सामावेश होता. १८८६ ते १९८८ या कालावधीतील गाडय़ा या प्रदर्शनात ठाणेकरांना पाहता आल्या.

(छाया- दीपक जोशी)