महाराष्ट्राचा कानाकोपरा हिरवागार करण्यासाठी वन विभागाने कोटय़वधी झाडे लावण्याचा संकल्प केलेला असताना ठाणे जिल्ह्य़ात अस्तित्वात असलेले शेकडो एकरचे हरितपट्टे (खारफुटी जंगल) भूमाफियांनी खारफुटी, पाणवनस्पती तोडून, नैसर्गिक स्रोत बुजवून नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. भिवंडीजवळील काल्हेर, कशेळी, गुंदवली आणि वळ या गावांच्या दरम्यान असलेल्या शेकडो एकरच्या हरितपट्टय़ावरील खारफुटी भूमाफियांनी नष्ट करून तेथे गोदामे, चाळी बांधल्या आहेत.

जागतिक खारफुटी दिनानिमित्त (मॅनग्रोव्ह डे) खारफुटी संवर्धनाचे कार्यक्रम शासन स्तरावर आयोजित केले जातात. प्रत्यक्षात जी कारवाई शासन यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे, त्यावर मंथन होत नसल्याने खारफुटीची जंगले मात्र हळूहळू नष्ट होत चालली आहेत. कांदळवन संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समित्यांपेक्षा भूमाफिया शिरजोर असल्याने कांदळवनांचे भवितव्य अंधकारमय आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, वैतरणा, भातसा धरणांकडून येणाऱ्या जलवाहिन्या काल्हेर, कशेळी, गुंदवली गावांच्या भागातून मुंबईकडे नेण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्यांच्या अवतीभोवती खारफुटीचे जंगल आहे. खारफुटीमुळे हा परिसर बारमाही हिरवागार असतो. या भागातून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांतून पाणी ठिबकत असते. भिवंडी शहराबाहेरील गावांमधील पट्टे सदाहरित असतात. या हरित पट्टय़ांवर वन विभागाचा कांदळवन विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांचे नियंत्रण असते. काही जागा महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या अखत्यारीत येत आहेत.

गावपातळीवर काम करणाऱ्या महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी गाव परिसरात होणारा रेतीउपसा, खारफुटीतोड याची माहिती तात्काळ तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना देणे आवश्यक असते; परंतु स्थानिक अधिकारी भूमाफियांशी संगनमत व साटय़ालोटय़ांचे व्यवहार करीत असल्याने ते या सर्व घडामोडींबाबत गुपचिळी धरून बसतात, अशी विश्वसनीय माहिती आहे.

भिवंडीजवळील काल्हेर, कशेळी, गुंदवली, वळ या गावांच्या भागात शेकडो एकरचा खारफुटी जंगलाचा हरितपट्टा मागील अनेक वर्षांपासून आहे. या भागावर खारफुटीचे जंगल असल्याने या भागात बारमाही पाण्याने भरलेली तळी, डबकी आढळून येतात. या पाण्यावर या भागातील रहिवासी उन्हाळी भाजीपाला लागवड करतात. खारफुटीच्या जमिनी सरकारी असल्याने या भागातील भूमाफियांनी, राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने या भागात बेधडक गोदामे, चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे.

भिवंडी परिसरात खारफुटीच्या जंगलातील झाडांची तोड करणाऱ्या ३० जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. खारफुटीची झाडे तोडून जेथे बांधकामे करण्यात आली आहेत, ती बेकायदा बांधकामे तातडीने जमीनदोस्त करण्यात येतात. भिवंडी परिसराचे नियोजन प्राधिकरण एमएमआरडीए आहे. त्यामुळे या भागातील बांधकामांवर कारवाईचे थेट अधिकार त्यांनाही आहेत. प्राधिकरणालाही वेळोवेळी याबाबत माहिती देण्यात येत आहे.  काल्हेर, कशेळी भागात खारफुटी नष्ट करण्यात येत असेल तर तेथे पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

– शशिकांत गायकवाड, तहसीलदार, भिवंडी