उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाबाहेर साठवून ठेवण्यात येत असलेल्या कचऱ्याला रविवारी दुपारी आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेला प्रचंड धूर आसपासच्या गावात पसरल्याने ग्रामस्थांना पुन्हा त्रास सहन करावा लागला. अनेकांना मळमळणे, डोळ्याची आग होणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशा प्रकारचा त्रास होऊ लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी कचरा मात्र अद्याप धुमसत आहे.
उत्तन येथील घनकचरा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यायी जागा नसल्याने मिरा भाईंदर महापालिका कचरा प्रकल्पाबाहेरच मोकळ्या जागेत साठवत आहे.
शहरात दररोज सुमारे चारशे टन कचरा निर्माण होत असल्याने सध्या प्रकल्पाबाहेर कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहे.
या कचऱ्यातून निर्माण होणारा मिथेन हा विषारी वायू पेट घेत असल्याने कचऱ्याला सातत्याने आग लागत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच मुद्दय़ावर स्थानिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली. लवादाने घनकचरा प्रकल्प तातडीने स्थलांतर करण्याचे व सध्या साठून राहिलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान प्रकल्पाबाहेर साठून राहिलेल्या कचऱ्याला आग लागू नये म्हणून आयआयटीच्या सल्ल्याने उपाययोजना करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यानुसार पालिका कचऱ्यावर आयआयटीने सुचविलेल्या रसायनाची फवारणी करत आहे.
परंतु या फवारणीचा फारसा उपयोग झाला नसल्याचे रविवारी लागलेल्या आगीवरून स्पष्ट झाले आहे. या आधी साठवून ठेवण्यात येत असलेला कचरा वारंवार धुमसत असल्याने सध्या त्याच्याच बाजूला दुसऱ्या ठिकाणी कचरा साठवला जात आहे. याच कचऱ्याला रविवारी दुपारी आग लागली.
* गेले दोन दिवस कचरा धुमसत होता मात्र रविवारी दुपारी त्याचे आगीत रूपांतर झाले. यामुळे धुराचे लोटच्या लोट निर्माण होऊन ते आसपासच्या गावात पसरले अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
* मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र कचरा उशिरापर्यंत धुमसतच होता.