‘एमआयडीसी’च्या जलवाहिन्यांवर वर्षांनुवर्षे पाणीमाफियांचे राज्य; कारवाईत प्रशासन थंड
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिन्यांवरून वर्षांनुवर्षे बेकायदा पद्धतीने पाण्याची चोरी करणाऱ्या जलमाफियांविरोधात गुन्हे दाखल करण्यात प्रशासनाने पुन्हा एकदा हात अखडता घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. पाणी टंचाईच्या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडाभरात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई केली. यात आजवर ७८ नळजोडण्या तोडल्या आहेत; पण पाण्याची चोरी करणाऱ्यांना मात्र अभय दिले गेल्याची चर्चा आहे.
पाणी चोरांविरोधात महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यावर ही कारवाई पुन्हा एकदा वरवरची मलमपट्टी ठरण्याची चिन्हे आहेत.
धरणातील पाणी साठा कमालीचा रोडवल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठय़ात तब्बल ५० टक्क्य़ांची कपात करण्यात आली आहे. कपातीचा फटका जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांना बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवली, तसेच २७ गावांच्या परिसरास या पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसू लागली आहे. यासंबंधीची ओरड वाढू लागल्याने खडबडून जागे झालेल्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवडय़ापासून पाणी चोरांविरोधात मोहीम उघडल्याचे नाटय़ उभे केले आहे. डोंबिवली शहरालगत तसेच शिळफाटा रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीला बेकायदा नळजोडण्या बसवून लाखो लिटर पाणी चोरले जात आहे. काही गॅरेज मालक, तसेच हॉटेल चालक या पाण्याचा वापर करताना दिसत आहेत. गेली अनेक वर्षे या जोडण्यांकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. गेल्या आठवडय़ापासून मात्र त्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. आतापर्यत ७८ नळजोडण्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खंडित केल्या आहेत. एमआयडीसीच्या वतीने काटई ते पाले (अंबरनाथ), मल्लंगगड ते टाटा पॉवपर्यंतच्या जलवाहिनीवरील बेकायदा जोडण्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलंगरोड परिसरात ही कारवाई सुरू असल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे साहाय्यक अभियंता धनराज नखाते यांनी सांगितले. सुरक्षा दलाच्या सुरक्षिततेखाली ही कारवाई सुरू असल्याने कोणीही या कारवाईला विरोध केला नाही. मात्र वसार गाव त्यास अपवाद आहे. वसारमधील ग्रामस्थांनी या कारवाईस विरोध केला. सुरक्षा दलाच्या जवानांमुळे त्यांचा विरोध तत्काळ मावळला. या गावातील नळजोडण्याही तोडल्या असल्याचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सांगितले.

वेळखाऊ प्रक्रिया
७८ नळजोडण्या तोडूनही अद्याप एकावरही गुन्हा दाखल का करण्यात आला नाही याविषयी शंकर जगताप म्हणाले, कागदपत्र तयार करून गुन्हा दाखल करणे ही प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत खूप वेळ जात असल्याने प्रथम कारवाईला प्राधान्य दिले आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही नळजोडण्या नक्की कोणाच्या आहेत याचा शोध अद्याप लागला नाही. त्यामुळे पुरेसे कागदपत्र, पुरावा आणून या गुन्हेगारांवर नक्कीच गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.