मीरा रोड रहिवाशांच्या नशिबी बारमाही दुष्काळ

पावसाने पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण शहरात लागू करण्यात आलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे मीरा भाईंदरवासीयांची तारांबळ उडत असताना मीरा रोडमधील सेक्टर दोनच्या रहिवाशांसाठी तर हा दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून दररोज अवघी १५ मिनिटे पाणी मिळत असल्याने टंचाईने त्रस्त झालेल्या या परिसरात आता आठवडय़ातून दोन दिवस पाणीच येणार नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

मीरा रोडच्या सेक्टर दोनमधील सी ३९, ४० या इमारतीमधील रहिवाशांना गेल्या दीड-दोन वर्षांपासून केवळ पंधरा मिनिटेच पाणी मिळते. अशा परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे असा मोठा प्रश्न रहिवाशांपुढे उभा आहे.   शांतीनगर वसाहतीतील इमारतींना पाणी साठविण्यासाठी तळमजल्याला सिमेंट काँक्रीटच्या टाक्या बांधलेल्या नाहीत. त्यामुळे जलवाहिनीतून येणारे पाणी थेट गच्चीवरील टाक्यांमध्ये सोडण्यात येते. या पाण्याचा दाब पुरेसा नसल्याने टाक्यांमधून पाणीही कमी जमा होते. इमारतीच्या आवारातच मोठय़ा टाक्या बसवून त्याला जलवाहिनी जोडायची रहिवाशांची मागणी आहे,

दरम्यान, ‘या इमारतींच्याच शेजारी महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. टाकीचे काम पूर्ण झाले की येथील पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्यात येईल त्यामुळे या रहिवाशांना योग्य दाबाने पुरेसे पाणी उपलब्ध होईल,’ असे पालिकेचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले.