18 October 2019

News Flash

चिंचवली गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण

अंबरनाथ तालुक्यात येणारे हे गाव मलंगगडाच्या पायथ्याशी आहे. मुसळधार पाऊस पडूनही गावातील महिलांना पाण्यासाठी विजेवर अवलंबून राहावे लागते.

|| भगवान मंडलिक

वीजपुरवठा खंडित होताच पाणी योजना बंद होत असल्याने हाल:- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात चिंचवली हे बाराशे लोकवस्तीचे गाव. अंबरनाथ तालुक्यात येणारे हे गाव मलंगगडाच्या पायथ्याशी आहे. मुसळधार पाऊस पडूनही गावातील महिलांना पाण्यासाठी विजेवर अवलंबून राहावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की गावातील पाणीपुरवठा योजना बंद राहते. तोपर्यंत पाण्यासाठी चातकासारखी महिलांना वाट पाहावी लागते.

चिंचवली गावात १२० घरे आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका बसविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून गावात प्लास्टिक पाण्याचा जलकुंभ बसविण्यात आला आहे. कूूपनलिकेतील पाणी प्लास्टिक जलकुंभात टाकले जाते. वीजपुरवठा बंद असेल तर पाणी खेचणारे यंत्र बंद असते. त्यामुळे टाकीत पाणी चढत नाही. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाण्यासाठी वाट पाहावी लागते.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार तसेच उमेदवार गणपत गायकवाड महिला पाण्याविषयी नाराजी व्यक्त करीत असताना चिंचवली गावातून पोसरी गावाकडे आपल्या प्रचाराच्या ताफ्यासह रात्रीच्या वेळेत रवाना झाले. त्यांनी गावक ऱ्यांना गाडीतूनच हात करण्यापलीकडे काही केले नाही. या वेळी गावातील महिला रात्रीच्या वेळेत टाकीवर पाणी भरण्याचे काम करीत होत्या. पाच वर्षांत आमदारांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवली अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.

दिवसभर शेतात, कष्टाचे काम करायचे आणि घरी आल्यानंतर पाणी नाही म्हणून पाण्यासाठी वाट पाहात बसायचे. हे किती दिवस चालणार, असे प्रश्न महिला करीत आहेत.

नेवाळी फाटा येथून एमआयडीसीच्या मुख्य वाहिनीवरून एक जलवाहिनी टाकून दिली तर पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. मात्र, यास एमआयडीसीकडून विरोध केला जातो, असे ग्रामस्थांनी सांगितले.

येत्या काळात कल्याण पूर्व ग्रामीण भागातील पाणीटंचाई सोडविण्याला प्रथम प्राधान्य देणार आहे. या भागातून एमआयडीसीच्या जलवाहिन्या मुंबईकडे गेल्या आहेत. या वाहिन्यांवरून या गावांना पाणी दिले तर या भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. हा प्रश्न शासन पातळीवरून मार्गी लावला जाईल. -गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व

First Published on October 10, 2019 2:07 am

Web Title: water shortage in chincholi gaon akp 94