ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवार २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार २४ मार्चपर्यंत सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या वेळात महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

त्यामुळे होळीच्या दिवशीसुद्धा ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी कपात होणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून मंगळवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इंटर्निटी या परिसरात पाणीपुरवठा सुरू राहील. तर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहील. बुधवार २३ मार्च रोजी सकाळी ९ ते गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे.

एमआयडीसीचे पाणी ६० तास बंद महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार २३ मार्च सायंकाळी ६ ते शनिवार २६ मार्च सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे.