संपूर्ण शहरात महापालिकेची योजना

ठाणे : ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकल्प राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून शहरात बुधवारपासून मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली आहे. ठाणे सिटी वाय-फाय या नावाने ही सुविधा सुरू करण्यात आली असून त्यामुळे ठाणे शहर आता वाय-फाययुक्त झाले आहे. या सेवेत शंभर रुपये भरून नोंदणी करून ठाणेकरांना ८०० केबीपीएस वेगाने अमर्यादित मोफत वाय-फाय वापरणे शक्य होणार आहे. त्यापेक्षा जास्त वेग हवा असल्यास ठाणेकरांना शुल्क भरावे लागणार असून त्यासाठी दहा रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंतच्या योजना पालिकेने जाहीर केल्या आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराला वाय-फाययुक्त करण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती. या घोषणेनंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने या योजनेची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू केले होते. या योजनेसाठी शहरातील विद्युत खांबांवर वाय-फाय यंत्रणा बसविली असून त्याआधारे ठाणेकरांना मोफत वाय-फाय सेवा पुरविली जात आहे. काही महिन्यांपूर्वी ही सेवा सुरू करण्यात आली असून त्याचा तीन लाख नागरिक लाभ घेत आहे. मात्र या सेवेसाठी वाणिज्य वापरासाठी योजना जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. ही योजनाही आता जाहीर करण्यात आली असून ती बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. त्या वेळी उप नगर अभियंता सुनील पोटे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल उपस्थित होते.

ठाणे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाय-फाय यंत्रणेचे जाळे उभारण्यात आले असून पुढील दहा वर्षे ही सेवा शहरात कार्यरत राहणार आहे. ठाणे सिटी वाय-फाय या नावाने ही सुविधा सुरूकरण्यात आली आहे. या नावाने मोबाइलमध्ये लॉगइन करून नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो. या सेवेत ठाणेकरांना ८०० केबीपीएस वेगाने अमर्यादित मोफत वाय-फाय वापरता येणार आहे. त्यापेक्षा जास्त वेग हवा असल्यास त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी दहा रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंतच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

योजना अशा..

८०० केबीपीएसपेक्षा अधिक वेग हवा असल्यास विविध योजना जाहीर करण्यात आल्या असून त्यासाठी ठाणेकरांना शुल्क भरावे लागणार आहे. या योजनेत १० रुपयांमध्ये २ जीबी डाटा एक दिवस, ३० रुपयांमध्ये ५ जीबी दोन दिवस, ५० रुपयांमध्ये २० जीबी ७ दिवस, १०० रुपयांमध्ये ४५ जीबी १४ दिवस, १५० रुपयांमध्ये १०० जीबी २८ दिवस, २०० रुपयांमध्ये १५० जीबी २८ दिवस, ३०० रुपयांमध्ये २५० जीबी २८ दिवस आणि ४०० रुपयांमध्ये ४०० जीबी ५६ दिवसांसाठी ही सेवा वापरता येणार आहे.