पालिकेने लावलेली घरटी गायब; खाद्यभांडी रिती

नीलेश पानमंद / ऋषीकेश मुळे

ठाणे : ‘चिमणी वाचवा’ असा संदेश देत ठाणे शहरातील वृक्षांवर कृत्रिम घरटी उभारण्याची ठाणे महापालिकेची योजना पुरती फसली आहे. पाचपाखाडी परिसरात प्रयोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेली घरटी दिसेनाशी झाली आहेत. येऊरच्या डोंगरांवर आश्रय शोधणाऱ्या चिमण्या शहरात परताव्यात यासाठी, पाच लाख रुपये खर्च करून घरटी उभारली जातील, अशी घोषणा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली होती.

ठाणे शहरातील चिमण्यांची संख्या कमी होत असल्याने विविध पर्यावरणप्रेमी संस्थांकडून ‘चिमणी वाचवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ‘ठाणे सिटीझन फोरम’च्या माध्यमातून वर्तकनगर भागातील लक्ष्मी रेसिडेन्सी, नीलकंठ तसेच आसपासच्या मोठय़ा गृहसंकुलांमध्ये चिमणी व अन्य पक्ष्यांसाठी ४०० हून अधिक खाद्यभांडय़ांचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमाला अधिक बळ मिळावे आणि नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून आयुक्तांनी ‘चिमणी वाचवा अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला होता.

दोन वर्षांपूर्वी चिमणी दिनी त्यांनी या अभियानाचा शुभारंभ केला होता. त्यावेळी आयुक्त जयस्वाल यांनी महापालिका मुख्यालयासमोरील कचराळी तलाव भागात चिमण्यांची घरटी बसविली होती. त्यामध्ये चिमण्यांसाठी धान्य आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अशी घरटी उभारण्यासाठी अर्थसंकल्पात पाच लाख रुपयांची तरतूद करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यालय परिसरात उभारलेली घरटी गायब झाली आहेत.

या भागात केवळ एकच खाद्यभांडे राहिले असून त्यामध्येही चिमण्यांसाठी धान्य उरलेले नाही. त्यामुळे ही योजना बारगळल्याचे दिसते. शहरातील गृहसंकुले, तलाव, उद्यान आणि वनराईत ही घरटी बसविण्याची योजना आखण्यात आली होती.

सर्वत्र घरटी लावल्याचा दावा

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या तरतुदीनुसार संपूर्ण शहरात चिमण्यांसाठी घरटी बसविण्यात आली. या भागांची यादी आमच्याकडे आहेत. महापालिकेसमोर बसविलेली घरटी गायब झालेली नाहीत, असा दावा महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केला. प्रत्यक्षात ही घरटी कुठे आहेत ते दाखवा असा प्रतिप्रश्न केला असता, लवकरच दाखवू असे त्या म्हणाल्या.

जागतिक चिमणी दिन

आमच्या संस्थेमार्फत चिमणी वाचवा अभियान राबविण्यात येत असून त्यात पालिकेनेही पुढाकार घेतला होता. आमच्या संस्थेतर्फे चिमण्यांसाठी घरटी लावण्यात आली होती. त्यासाठी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूद केल्याची घोषणा आयुक्त जयस्वाल यांनी केली होती. पुढे काय झाले, हे माहिती नाही.

– कॅसबर ऑगस्टीन, ठाणे सिटीजन फोरमचे पदाधिकारी