News Flash

मंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस!

एकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

किन्नरी जाधव

ऑनलाइन खेळांची रंगत, वाचनासाठी पुस्तकांचे दालन

गेल्या काही वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पडेल ते काम जबाबदारीने पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली असून नव्या पिढीला मंडपात खेचून आणण्यासाठी आयोजकांना नवनव्या क्लृप्त्या वापराव्या लागत आहेत. ठाण्यातील डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडपात रात्री जागरणासाठी तरुणांनी यावे म्हणून यंदा आवारात चक्क ‘वायफाय’ इंटरनेट सुविधा दिली आहे.

ऑनलाइन चॅटिंग, मोबाइलवरील खेळ, फेसबुक, यूटय़ूब असे मनोरंजनाचे सगळेच पर्याय एकाच मंडळाच्या छताखाली अनुभवता येत असल्याने वायफाय असलेल्या या सार्वजनिक गणेश मंडळात जागरणासाठी तरुणांनी हजेरी लावलेली असते. एकीकडे इंटरनेटची सुविधा देत या तरुणांना वाचनाचीही गोडी लागावी यासाठी दहा दिवस मंडळाच्या आवारात मोफत पुस्तकांचे दालन उभे केले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती मूर्तीसमोर काही तरुण ऑनलाइन खेळ खेळतील तर काही तरुण पुस्तक वाचनात मग्न होतील, मात्र जुगार खेळण्याला यामुळे आळा बसेल, असा विश्वास या गणेश मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात जागरण करण्याची प्रथा आहे. पूर्वी मंडपात भजन, भारूड, हरिपाठ, नमन, दशावतारी आदी पारंपरिक खेळ होत होते. नाटक, वाद्यवृंद, पडद्यावरील सिनेमे यांचीही दहा दिवस रेलचेल असायची. आता मात्र सार्वजनिक गणेशोत्सवातील हे मनोरंजन मूल्य कमी झाले आहे. त्यामुळे मंडपात कार्यकर्ते येईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत दहा दिवस गणपतीमूर्तीबरोबर रात्रभर जागरणासाठी कोण येणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असतो. अनेकदा मंडळातील कार्यकर्ते आळीपाळीने जागरणासाठी उपस्थित राहतात. मात्र कार्यालय सांभाळून भक्तिभावाने मंडळात संपूर्ण कारभार पाहायचा आणि जागरणासाठी रात्रभर थांबायचे हे अनेकांना शक्य नसते. काही मंडळात तरुण जुगार खेळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत असतो. मंडळात रात्री जागरणासाठी कुणी नसल्यास मूर्तीचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. यावर तोडगा म्हणून डवलेनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी तरुणांना वायफायची सुविधा देऊ केली आहे. मंडळाच्या या प्रयत्नामुळे तरुणही रात्रीच्या जागरणासाठी वाट धरू लागले असून मागच्या वर्षीपेक्षा जास्त संख्येने तरुण जागरणासाठी येत असतात, असे या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

मोफत पुस्तक वाचनाची सोय

सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला ‘पब्जी’ हा मोबाइल खेळ रात्रभर खेळण्यासाठी तरुण या मंडळात हजेरी लावतात. हा खेळ समूहात खेळला जात असल्याने मंडळात हजेरी लावण्यापूर्वी हे तरुण एकमेकांशी संपर्क साधतात. कोणत्या वेळी ऑनलाइन यायचे हे ठरल्यावर ठरावीक वेळी समूहाने तरुणांचे जथे रात्री मंडळात येतात आणि रात्रभर मंडळातील इंटरनेटवर गणपतीसमोर पब्जीचा खेळ रंगतो, असे डवलेनगर गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने यांनी सांगितले. याशिवाय इंटरनेट सुविधेबरोबर तरुणांना वाचनासाठी मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यात आल्याने काही तरुण रात्रभर पुस्तक वाचनाचा आनंद घेतात, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:09 am

Web Title: youth for the awakening of the mandal wifi dose
Next Stories
1 गणेशोत्सवातील देखाव्यांतून पर्यावरण संवर्धनाची हाक
2 ‘लालबागचा राजा’ परिसरात चार दिवसात १३५ मोबाइल लंपास
3 खडू, पाटी, पुठ्ठय़ापासून गणेशमूर्ती
Just Now!
X