रेल्वे पोलिसांचे दुर्लक्ष : प्रवाशांचा आरोप
धावत्या लोकल ट्रेनवर भिरकावलेला दगड लागून अंबरनाथमधील युवा कलावंत आदिल शेख गंभीर जखमी झाला आहे. मुलुंड ते नाहूर दरम्यान हा प्रकार घडला असून त्याच्या उजव्या गालावर मार लागल्याने त्याला टाके पडले आहेत. ऐन दिवाळीत रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला. गेल्या चार महिन्यांतली तिसरी व या महिन्यातली दुसरी घटना असून धावत्या रेल्वेवर दगड मारण्याचे प्रकार वाढत चालले असतानाच रेल्वे पोलीस याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे; तर रेल्वे पोलीस झोपा काढत असल्याचा आरोप रेल्वे प्रवाशांनी केला आहे.
लोकल ट्रेनवर दगड मारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी बदलापूरला राहणारी दर्शना पवार हिला बदलापूर-अंबरनाथ दरम्यान दगड मारण्यात आला होता, त्यात ती दगड लागून खाली पडून मृत्युमुखी पडली होती, तर १५ दिवसांपूर्वीच अंबरनाथच्या सुप्रिया मोरे हिला दगड लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. यावेळी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पोलीस चौकीत गेली असता तेथील पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याचे उपस्थितांना आढळून आले होते. त्यानंतर ही घटना घडली असून १२ नोव्हेंबरला आदिल शेखने अंबरनाथकडे येणारी ११.३० ची लोकल ट्रेन कुल्र्याहून पकडली होती. मात्र, मुलुंड ते नाहूर दरम्यान भिरकावण्यात आलेला दगड त्याच्या उजव्या डोळ्याखाली लागला व तो गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सुदैवाने त्याचा डोळा बचावला असला तरी त्याला टाके पडले आहेत. आदिलचा चेहरा अजूनही सुजलेला असून डोळ्याखालचा भाग काळवंडला आहे. दरवाजात उभ्या असलेल्यांनी तो दगड पाहिला होता व ते बाजूला झाल्याने तो दगड आदीलला लागला आहे. आदिल शेख अंबरनाथला राहणारा युवा कलावंत आहे. उल्हासनगरातील मोहंमद रफी फॅन्स क्लबचा तो सदस्य आहे. या घटनेविरोधातील तक्रार आदिलने अंबरनाथ रेल्वे पोलीस ठाण्यात दिली आहे. दगड फेकण्याच्या या लागोपाठ घटनांमध्ये बदलापूर-अंबरनाथचे प्रवासी बळी पडत असून प्रवाशांनी रेल्वे प्रवासाचीच धास्ती घेतली आहे. मात्र, रेल्वे पोलिसांनी या घटनांबाबत अद्यापही ठोस कारवाई केली नसून पोलीस अकार्यक्षम असून कर्तव्यावर असताना झोपा काढत असल्याचा गंभीर आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे.