|| भगवान मंडलिक

भाजप कार्यकर्ता धनंजय कुलकर्णीचे नाना ‘उद्योग’

सुमारे ३० वर्षांपूर्वी डोंबिवलीतील टिळकनगर येथे राहण्यास आलेला धनंजय कुलकर्णी हा सुरुवातीला छोटामोठा व्यवसाय करत असे. त्यानंतर तो फटाके विक्रीकडे वळला आणि नंतर शोभेची शस्त्रे विकू लागला. यातून जास्त पैसा मिळत असल्याचे लक्षात आल्यामुळेच त्याने प्राणघातक शस्त्रांच्या विक्रीचा बेकायदा व्यवसाय सुरू केला, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही मंडळींनी धनंजयचा पक्ष वा संघटनेशी संबंध नसल्याचे म्हटले असले तरी, ३० वर्षांपासून तो डोंबिवलीत भाजप कार्यकर्ता म्हणूनच मिरवत होता, अशी माहितीही समोर येत आहे.

आई, वडील आणि दोन भावांसह टिळकनगर येथे राहायला आलेल्या धनंजयने सुरुवातीच्या काळात व्हिडीओ कॅसेट भाडय़ाने देण्याचा व्यवसाय केला. हे करत असताना त्याने फटाके विक्री सुरू केली. महावीर नगर येथील अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर धनंजयचे ‘तपस्या फॅशनेबल’ हे शोभेच्या वस्तू विक्रीचे दुकान अनेक वर्षांपासून आहे. सुगंधीद्रव्ये, शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक या दुकानात येत असत. या दुकानातून धनंजय शोभेची शस्त्रेही विकत असे. या विक्रीतून चांगला पैसा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शस्त्र विक्री सुरू केली. उधळेपणामुळे त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी झटपट कमाई म्हणून त्याने हा उद्योग सुरू केला असावा, असा अंदाज काही परिचितांनी व्यक्त केला.

धनंजयच्या आईवडिलांचे निधन झाले आहे. त्याला दोन भाऊ असून त्यापैकी एक भाऊ सनदी लेखापाल असून तो अर्थक्षेत्रात उच्चपदस्थ आहे. धनंजयने आपल्या घराचा पत्ता टिळकनगर येथील दिला असला, तरी तो येथे राहतो याबाबत स्थानिकांनीच शंका व्यक्त केली आहे.

धनंजय टिळकनगर येथे राहण्यास आल्यापासूनच भाजपचा कार्यकर्ता म्हणून मिरवत असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांतही त्याची नियमित हजेरी असायची. निवडणूक काळात भाजपच्या प्रचारात तो नेहमीच पुढे असायचा, असे काही जण सांगतात. तर, अनेकदा पडद्यामागे तो इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांशीही संधान बांधून असे, असा खुलासा भाजपमधील काही मंडळी करत आहेत. भाजपचा डोंबिवलीतील नगरसेवक महेश पाटील याचा तो खंदा समर्थक मानला जात असे. महेश पाटील हा हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावरून सध्या तुरुंगात आहे.

संघातील ज्येष्ठ मंडळींनी ‘कुलकर्णी अलीकडेच संघात आला असावा’ असे म्हटले आहे. टिळकनगर येथे तो दरवर्षी महालक्ष्मी उत्सव आयोजित करत असे. त्याने स्वत:च एक मित्रमंडळही स्थापन केले होते. धनंजयने ‘अँटिकरप्शन क्राइम इंटिलिजन्स ब्युरो’ नावाची एक संस्था स्थापन केली असून या संस्थेचा तो स्वयंघोषित राष्ट्रीय अध्यक्ष आहे. या संस्थेच्या नावाने त्याने ‘व्हिजिटिंग कार्ड’ही तयार केली होती. या कार्डावर डोंबिवलीतील त्याच्या दुकानाचा तसेच नवी दिल्ली येथील ‘मुकुंदपूर, स्मिता व्हिलेज, नवी दिल्ली -११००४२’ असा पत्ता पुरवण्यात आला आहे.

आज कोठडीचा निर्णय

धनंजयला कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात झाली आहे. पोलिसांनी धनंजयला अटक केल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी किमान दोन दिवस तो पोलिसांना तपासासाठी हवा होता. त्याची तुरुंगात रवानगी झाल्याने पोलिसांना आपल्या मेहनतीवर पाणी फेरल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे धनंजयला अधिक तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी गुन्हे शाखेने कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर शनिवारी न्यायालय निर्णय घेणार आहे, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.