अंबरनाथमधून पलायन केलेले २९ मजूर संकटाचा सामना करीत गावी

सागर नरेकर, लोकसत्ता

अंबरनाथ : अंबरनाथमधील निवारा केंद्रातून २९ जणांनी पलायन केले होते. त्यांनी ४०० किलोमीटरहून अधिकचा पायी प्रवास करीत आपले गाव गाठले आहे. कडक ऊन आणि वाऱ्याचा सामना करत दिवस-रात्र ते पायी चालत होते.

टाळेबंदीनंतर स्थलांतर करणाऱ्या अनेकांना अडवून  त्यांना जागोजागी निवारा केंद्रात ठेवले होते. अंबरनाथमध्ये काही मजूर राहात होते. यातील उत्तर महाराष्ट्रातील जवळपास २९ जणांनी एकमेकांच्या सहवासात राहात असताना यावर नियोजनबद्ध मोहीम आखली. अवघ्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने ती अमलातही आणली. आम्ही एकत्र राहून एकमेकांशी चर्चा करायचो, एकमेकांचे दु:ख, त्रास आणि अडचणी समजून घेतल्या. मग केंद्राबाहेरची सुरक्षा समजून घेतली. सुरुवातीला पालिका आणि पोलीस प्रशासनच्या

अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली. मात्र त्यांनी ती काही मान्य केली नाही, मग पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संयम आणि सतर्कता ठेवली, असे या केंद्रातून जळगावच्या चोपडा तालुक्यात गेलेल्या एका मजुराने लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

आम्ही तिघे भाजीपाला आणायला जातो असे सांगून सकाळी नऊला निघालो. आम्हाला रस्त्यात कुणी अडवले नाही. निघताना फक्त अत्यावश्यक साहित्य, पैसे, मोबाइल चार्जर आणि अंगावरचे कपडे एवढेच सोबत घेतले. बाकी साहित्य निवारा केंद्रातच सोडले. अन्यथा आम्हाला अडवले असते, असेही त्यांनी सांगितले. सलग चार दिवसांत चालत आम्ही गाव गाठले, असेही त्यांनी सांगितले.

गावात पोहोचल्यानंतर तपासणी

नियोजनानंतर सर्वात आधी आम्ही निघालो होतो. मुलगा आणि पत्नी सोबत होती, मात्र पोलिसांनी अडवले नाही. आता इतर सहकाऱ्यांशी संपर्क  होत नाही, असे जळगाव जिल्ह्यातील धानोरा येथे जाणारे सांगतात. शाळेतल्या पोलिसांनी एकदा थांबवले होते. मात्र दवाखान्याचे कारण सांगून निघालो. घरी आई आजारी होती आणि तिकडे राहून काय करणार, स्वत:च्या जीवापेक्षा ते महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र गावात पोहोचल्यानंतर आम्ही स्वत:हून तपासणी केली. सर्व नियम पाळले, मात्र पळालो हेही खरे असेही ते सांगतात. सध्या हे २९ जण आपल्या कुटुंबीयांसोबत सुखरूप असून स्थानिक ग्रामपंचायतीने दिलेले आदेश पाळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तिसऱ्या दिवशीच घर गाठले..

तीन दिवस घरी पोहोचण्यासाठी लागले. घाटात कुणी अडवले नाही. काही हॉटेल मिळाले तिथे जेवण मिळाले. मात्र कुठेही थांबलो नाही. लक्ष्य फक्त गावी पोहोचणे होते. त्यामुळे भीती वगैरे मागे पडली. महामार्गावर ४० जणांचा समूह मिळाला. यांच्यात सहभागी होत तिसऱ्या दिवशीच  घर गाठले.