पाटकर शाळेमधील आयोजित स्पर्धात ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळांमध्ये सध्या स्पर्धाचा हंगाम सुरूआहे. सफेद बूट, सफेद गणवेशातील मुले मैदानावर बागडताना हमखास दिसतात. या वातावरणाचा लाभ विशेष मुलांनाही घेता यावा, त्यांनाही इतर मुलांप्रमाणे खेळ खेळता यावेत, यासाठी पाटकर ट्रस्टच्या वतीने विशेष मुलांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी पाटकर शाळेचे मैदान या मुलांच्या बागडण्याने फुलून गेले होते.

चंद्रकांत नारायण पाटकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विशेष मुलांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन रविवार, दि. २० डिसेंबरला येथील पाटकर विद्यालयाच्या मैदानात करण्यात आले होते. या स्पर्धेत डोंबिवलीतील रोटरी स्कूल फॉर डेफ, अस्तित्व मूकबधिर प्रबोधिनी, संवाद कर्णबधिर प्रबोधिनी, अस्तित्व मतिमंद मुलांची संरक्षित शाळा, सेंट जोसेफ डायनॅमिक स्कूल, क्षितिज मतिमंद मुलांची शाळा, सप्रेम बिंग अ स्माइल आदी आठ शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. वैयक्तिक धावणे, रिले, लांब उडी, गोळाफेक, बास्केट बॉल आदी स्पर्धाचा समावेश होता. त्यात कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या विभागातून रोटरी स्कूल फॉर डेफ व मतिमंद विद्यार्थ्यांच्या विभागातून अस्तित्व मतिमंद मुलांच्या शाळेने अजिंक्यपद पटकावले. त्यांना आकर्षक पारितोषिक व फिरता चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण, कांस्य, रजत पदक देण्यात आले.

जलतरणपटू श्रेयस पारकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून ट्रस्टच्या वतीने या स्पर्धा भरविण्यात येत आहेत. विशेष मुलांमधील खेळाडू वृत्तीला चालना देणे, आपणही या समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आपणही सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकतो, याचा विश्वास येण्यासाठी हा स्पर्धा भरवितो, असे ट्रस्टच्या अध्यक्षा जयंती पाटकर यांनी या वेळी सांगितले.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 350 students participated in the competition organized by the patkar school
First published on: 22-12-2015 at 03:08 IST