घोडबंदर रस्त्यावरील उपाहारगृहांचे रोजचे उत्पन्नात ६० टक्क्यांची घट

नीलेश पानमंद, ठाणे</strong>

मेट्रो प्रकल्प आणि सेवा रस्त्यांची कामे एकाचवेळी सुरू असल्याने घोडबंदर मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले असताना येथील हॉटेल व्यवसायावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. घोडबंदर रस्त्यालगत असलेल्या हॉटेलांपर्यंत पोहोचण्यासाठीच एक ते दीड तास खर्ची घालावे लागत असल्याने ग्राहक येथे येण्याचे टाळू लागले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायाचे दररोजचे उत्पन्न ६० ते ७० टक्क्यांनी घसरल्याचा दावा व्यावसायिक करत आहेत.

गेल्या काही वर्षांत घोडबंदर तसेच शिळ-कल्याण मार्गावर हॉटेल व्यावसायिकांनी बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. तरुणाईचे आकर्षण असलेले पबही या भागात वाढले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी या हॉटेलांत तसेच पबमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ही गर्दी ओसरू लागली आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत अडकून वेळ वाया घालवण्याऐवजी अनेक ग्राहकांनी येथे येणे टाळण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून हॉटेलचे उत्पन्न ६० ते ७० टक्क्य़ांनी कमी झाले आहे. ३० डिसेंबरला घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीच्या भीतीमुळे ३१ डिसेंबरला ग्राहकांनी हॉटेलकडे पाठ फिरविली. ३१ डिसेंबरच्या रात्री वाहतूक कोंडीमुळे हॉटेल व्यवसायाचे उत्पन्न ५० टक्क्यांनी घटले असून दररोजचे उत्पन्न ८० टक्क्य़ांनी घटल्याचे अ‍ॅम्ब्रोसिया हॉटेलचे मालक गिरीश ठाकूर यांनी सांगितले.

घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असल्यामुळे ठाणे शहरातील ग्राहक हॉटेलमध्ये येणे टाळत आहेत. त्यामुळे एक ते दीड महिन्यांपासून उत्पन्न ६० ते ७० टक्क्य़ांनी कमी झाले आहे.

 ब्रिजेश शर्मा , शेल्टर हॉटेलचे मालक