लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील खंबाळपाडा भागातील केडीएमटी बस आगाराजवळील एस. एस. स्टील मार्टजवळील मागील अकरा वर्षाच्या कालावधीत बांधण्यात आलेली सात माळ्याची बेकायदा इमारत फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या तोडकाम पथकाने गुरूवार आणि शुक्रवारी भुईसपाट केली.

या पाडकामाचा सर्व खर्च विकासकांकडून वसूल केला जाणार आहे. जमीन मालक धनंजय शेलार, विकासक अश्विनी ब्रिजराज पांडे, संदीप मोहन डोके, महेश मधुकर लहाने यांनी ही सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती. या इमारतीला २००९ च्या काळात निवृत्त उपअभियंता सुनील जोशी पालिकेच्या नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक असताना तीन माळ्याची बांधकाम परवानगी देण्यात आली होती. या अधिकृत इमारतीवर काही वर्षांनी विकासकांनी चार वाढीव माळे पालिकेच्या नगररचना विभागाच्या परवानग्या न घेता बांधले होते.

आणखी वाचा-खराब रस्त्यांमुळे डोंबिवलीतील नागरिक हैराण; नवीन रस्ते, वाहिन्या टाकण्याच्या कामांसाठी रस्ते खोदाई

हे प्रकरण सुरूवातीला ‘लोकसत्ता’ने उघडकीला आणले होते. तक्रारदार राजेंद्र नांदोस्कर मागील दहा वर्षापासून या बेकायदा इमारतीवर कारवाई करा म्हणून पालिकेत तक्रार करत होते. परंतु, पालिकेतील एका अधिकाऱ्याचा या बांधकामाशी संबंध असल्याने तो अधिकारी या बेकायदा इमारतीवर कारवाई होऊन देत नव्हता, असे आता पालिका अधिकारीच खासगीत सांगतात.

हा अधिकारी सेवानिवृत्त होताच नांदोस्कर यांच्या तक्रारींची दखल घेऊन पालिकेने .या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी या इमारतीची नगररचना विभागाकडून खात्री केल्यावर ही इमारत बेकायदा असल्याचे निष्प्न्न झाले. गेल्या वर्षी ही इमारत अनधिकृत घोषित करून साहाय्यक आयुक्त जगताप यांनी विकासकाला स्वताहून ही इमारत पाडून घेण्याचे आदेश दिले होते. तरीही विकासक त्यास दाद देत नव्हता. पोलीस बंदोबस्त मिळताच साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, अधीक्षक जयवंत चौधरी, शिरीष भोईर आणि तोडकाम पथकातील कामगार यांनी शक्तिमान कापकाम यंत्राच्या (हाय जॅक सॉ) साहाय्याने रामनगर पोलिसांच्या बंदोबस्तात बेकायदा इमारत गुरुवार आणि शुक्रवारी भुईसपाट केली. या कारवाईने परिसरातील रहिवाशांंनी समाधान व्यक्त केले आहे. या इमारती मधील सदनिका ग्राहकांची फसवणूक करून विकण्याची घाई विकासकांनी चालवली होती.

आणखी वाचा-बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे आज लोकार्पण

फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जगताप यांनी वर्षभराच्या कालावधीत दोन इमारती भुईसपाट केल्या आहेत. मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील जमीन मालक केतन दळवी यांच्या जागेवर एका परप्रांतीयाने बांधलेली बेकायदा इमारत भुईसपाट केली होती.