अभिजित केळकर, अभिनेते

‘चंपक’, ‘चांदोबा’, ‘ठकठक’ या बालसाहित्यांपासून माझ्या वाचनाची सुरुवात झाली. अगदी लहानपणापासूनच हा स्नेहबंध निर्माण झाल्याने पुस्तकांशी वेगळे नाते तयार झाले. ‘चंपक’ वगैरे मासिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बालसाहित्यात वाचनाची आवड निर्माण होण्याचे विलक्षण सामथ्र्य होते. कालांतराने ही पुस्तके नाहीशी झाली.  मालाडमध्ये माझे बालपण गेले.    तेथील उत्कर्ष मंदिर शाळेत शिकत असताना दरवर्षी वक्तृत्व, पठण अशा स्पर्धामध्ये मी हमखास भाग घेत असे आणि दरवर्षी प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळत असे. याचे कारण लहानपणापासून करत आलेले वाचन. या स्पर्धामुळे मला वाचनाची गोडी लागत गेली. कादंबऱ्या या साहित्य प्रकारात मी रमत नाही. मला चरित्र वाचायला आवडतात. आपण त्या चरित्रातून काही तरी शिकू शकतो, या उद्देशाने मी आत्मचरित्र वाचतो. डॉ. श्रीराम लागू यांचे ‘लमाण’, विजया मेहता यांचे ‘झिम्मा’, गोविंद पानसरे यांचे ‘कोण होता शिवाजी’ अशी पुस्तके मला खूप आवडली. मला रहस्यमय पुस्तके वाचायलाही आवडतात. मला पुस्तके शेअर करायला फार आवडतात. अर्थात समोरची व्यक्ती तेवढी रसिक असावी. सध्या कामांमध्ये व्यस्त असल्याने निवांतपणे वाचायला असा वेळ मिळत नाही, पण शूटिंगदरम्यानचा वेळ वायफळ न घालवता मी पुस्तक वाचण्यात सार्थकी लावतो. नवमाध्यमांमध्ये सध्या अनेक उपकरणे आली आहेत. त्यातून आपण पुस्तक वाचू शकतो, पण हातात धरून पुस्तक वाचले तर ते अधिक मनाशी भिडते.

माझ्या घरात मी पुस्तकांसाठी खास कपाट तयार केले आहे. ज्यात नाटक, चरित्र या साहित्य प्रकारांतील काही पुस्तके आणि काही बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तक आहेत. जवळपास शंभरेक पुस्तकांचा साठा माझ्याकडे असावा. पुस्तक आणि त्यात पुस्तकांबरोबरच्या जिव्हाळ्याच्या आठवणीही आहेत.

शाळेत ज्या विविध स्पर्धा असायच्या त्या स्पर्धाचा बक्षीस  समारंभ १ ऑगस्ट टिळक पुण्यतिथीला असायचा. एका वर्षी सालानुरूप बक्षीस समारंभ होत असताना मला वाचनामध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आणि त्याच दिवशी माझ्या लाडक्या लहान बहिणीचा जन्म झाला. ती बक्षीस म्हणून मिळालेली पुस्तके धावत हॉस्पिटलमध्ये जाऊन मी माझ्या बहिणीला- मीनलला दाखवली. माझ्या अनेक आठवणीतला हा क्षण अगदी माझ्या जवळचा आहे.

मध्यंतरीच्या काळात आम्ही घर शिफ्टिंग करत होतो, त्याच वेळी माझी बायको तृप्ती गरोदर होती. मधुरा वेलणकर या माझ्या मैत्रिणीने मला एक पुस्तक भेट म्हणून दिले होते ‘बाळंतपणात बायकांची काळजी कशी घ्यायची’ या संदर्भातले ते पुस्तक होते. मात्र घर बदलण्याच्या गडबडीत ते पुस्तक नकळत हरवले. ज्या पुस्तकाची मला एक बाबा म्हणून आणि नवरा म्हणून गरज होती, तेच पुस्तक कुठे तरी गहाळ झाले. खूप प्रयत्न करून मी ते पुस्तक शोधले. याशिवाय ‘तोतोचांद’, ‘ययाती’, ‘श्यामची आई’ अशी पुस्तके आवडीने वाचली.

माझ्या प्रत्येक लहानमोठय़ा घटनेत मला पुस्तकांनी फार आधार दिला. एखादे पात्र रंगवताना मला माझ्या वाचनाचा खूप उपयोग झाला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘बालगंधर्व’, ‘काकस्पर्श’ किंवा ‘तुझं आणि माझे जमेना’सारखा एखादा कार्यक्रमासाठी वाचलेल्या पुस्तकांचा उपयोग झाला. वेगवेगळ्या नात्यांशी जोडणारी पुस्तके म्हणूनच माझ्या कायम सान्निध्यात असतात.

शब्दांकन – ऋषिकेश मुळे