परी तेलंग, अभिनेत्री

मानवी नाती काळानुसार बदलत जातात. पुस्तकांचं तसं नसतं. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर पुस्तकं तुम्हाला सोबत करीत असतात. माझं आणि पुस्तकांचंही असंच घट्ट नातं आहे. पुस्तकांवर माझं प्रेम आहे. ती माझी मित्रं आहेत. आयुष्यात सकारात्मक दृष्टी अंगी बाणवण्यासाठी उत्तम पुस्तकांचं वाचन खूप उपयोगी ठरतं.

Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

पुस्तकांचं वाचन हा खरं तर सकारात्मकतेकडे जाणारा प्रवास आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला की सर्व त्याचप्रमाणे घडेल, हा विश्वास पुस्तकांच्या वाचनातून मिळतो. जर तुम्हाला काही तरी करण्याची इच्छा असेल तर नक्कीच मार्ग असतो आणि प्रयत्न केले तर रस्ता नक्कीच सापडतो. पुस्तकं आपल्याला ही आशादायक ऊर्जा पुरवितात.

माझ्या आयुष्यातला एक काळ असा होता की, मला पुस्तक वाचल्याशिवाय झोपच येत नव्हती. त्यामुळे पुस्तकाची पन्नासऐक पानं वाचूनच झोपायचं ही माझी दिनचर्या ठरून गेली होती. कधी कधी तर शंभर-दीडशे पानं वाचून झाली तरी भान राहत नसे. उत्तररात्र होऊन जायची. कधी कधी पहाटही व्हायची. एकूणच मी अक्षरश: झपाटल्यासारखी वाचत असायचे.

माझी आणि पुस्तकांची गाठभेट मी सातवीत असताना झाली. मी सुट्टीत मंदार देवस्थळींकडे राहायला जायची. तेव्हा एकदा माझा छोटा अपघात झाला होता. बाहेर मला कुठं जाता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला घरातल्या घरात वाचण्यासाठी चंपक, ठकठक ही मासिकं दिली होती. मी ती आवडीने वाचली आणि मग तो प्रवास सुरूच झाला. दुसरीत असताना मी माझं पहिलं नाटक केलं. त्याचं नाव ‘मंत्रमुग्ध’. त्या वेळी उदय सबनीसांनी मला ‘तोतोचान’ नावाचं पुस्तक भेट दिलं होतं. तेत्सुरो कुरोयानागा यांनी लिहिलेलं हे मूळ जपानी पुस्तक आहे. चेतना सरदेशमुख यांनी ते अनुवादित केलं आहे. लहान मुलीची गोष्ट आहे त्यात. ती आणि तिचं स्वप्नाळू जग. माझं हे सर्वात आवडतं पुस्तक आहे.

मी लहानपणासून खूप बडबडी होते आणि त्यात माझ्या आयुष्यात पुस्तकं आल्यापासून मी स्वत:शीही कनेक्ट झाले.

शाळेची कशी पहिली-दुसरी अगदी तसंच वाचनाची पहिली-दुसरी म्हणजे पुल, साने गुरुजी. तशी पुस्तकं मी भरपूर वाचली. त्यानंतर कॉलेजला असताना तसं माझं वाचन कमी झालं होतं. पण त्यातही मी ‘दा विन्ची कोड’, ‘राधेय’, ‘मृत्युंजय’ आदी कादंबऱ्या वाचल्या. वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ मला खूप आवडते. मी मुळातच नाटय़वेडी आहे. त्यामुळे कादंबरी वाचताना माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं.

हिटलरच्या जीवनावरील ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, चार्ली चॅप्लीन यांचं ‘हसरे दु:ख’ ही पुस्तकं खूप काही शिकवून जातात.

आता काळानुरूप वाचनाची माध्यमं बदलत आहेत. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप या समाज माध्यमांचाही वाचनासाठी वापर केला जाऊ लागला आहे. मी त्यापद्धतीने वाचत असते. आता पूर्वीइतका वाचायला वेळ मिळत नाही. मात्र भविष्यात निवांत वेळ काढून फक्त पुस्तकं वाचण्याचं ठरविलं आहे. कारण मोठी स्वप्नं दाखवून ती पूर्ण करण्याची प्रेरणा पुस्तकांमधूनच मिळते.