अन्न व औषध प्रशासनाची माहिती, गरजूंना थेट संपर्क साधण्याचे आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने  उपचारासाठी आवश्यक औषधे तसेच ऑक्सीजन यांच्या उपलब्धतेबाबत साशंकता निर्माण व्यक्त होत होती. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्यर्ा ठाणे विभागीय सहाय्यक आयुक्त दुष्यंत भामरे यांनी पालिका क्षेत्रात औषधे व प्राणवायू यांचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. करोनाबाधितांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर हे औषधही मुबलक प्रमाणात असून त्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी आल्यास थेट मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण आढळून येत असून त्यात ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रूग्णांची नोंद होते आहे. सरासरी  दीड हजार ते सतराशेपर्यंत रूग्ण अवघ्या एका दिवसात आढळत असल्याने औषधे, प्राणवायू आणि करोना बाधितांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड होत होती. मात्र ठाणे महापालिका क्षेत्रात रेमडेसिवीर औषधासह वैद्यकीय प्राणवायू आणि इतर औषधे पुरेशा प्रमाणात आणि योग्य किमतींत उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागीय परिमंडळ एकच्या वतीने देण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने परिमंडळ एकचे सहायक आयुक्त दुष्यंत भामरे यांनी एक प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे. उपचारासाठी लागणारी सर्व औषधे, मुखपट्टी आणि जंतुनाशकेही पुरेसे असून ही उपलब्धता कायम राखण्यासाठी उपाययोजना  केल्या जात असल्याचे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. शहरात रक्त व रक्तघटकाचा तुटवडा होऊ  नये यासाठी सर्व रक्तपेढय़ांना योग्य काळजी घेऊन रक्तदान शिबीर घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना औषधे, रेमडीसिवीरच्या उपलब्धतेबाबत मदत हवी असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

इथे मिळेल मदत

रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना औषधांच्या उपलब्धतेबाबत मदत हवी असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयाच्या १८००२२२३६५  या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात औषध निरीक्षक कैलाश खापेकर   ८८५०४५४९६३ आणि व्ही. आर. रवी ८८५५९३९५५० यांना संपर्क करण्याचे आवाहन अन्न व औषध विभागातर्फे करण्यात आले आहे.