वादग्रस्त प्रस्तावांविषयी शिवसेनेची सारवासारव

ठाणे शहरातील मैदाने बिल्डरांना सुशोभीकरण आणि देखभालीसाठी ३० वर्षांनी भाडेपट्टय़ांवर देण्याचे धोरण प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मांडले होते. या प्रस्तावाशी शिवसेनेचा थेट संबंध नाही, असे स्पष्टीकरण सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. या प्रस्तावास शिवसेनेतील एकाही नगरसेवकाचा विरोध नाही, असेही ते पुढे म्हणाले. कळवा खाडीवर चौपाटी उभारण्याची निविदाही प्रशासनाकडून मांडण्यात आली होती. आम्ही केवळ त्यास मंजुरी दिली अशी सारवासारवही त्यांनी या वेळी केली.

ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर प्रशासनाने विषय मंजुरीसाठी आणले होते. या विषयांवर चर्चा करण्याऐवजी भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहाबाहेर निघून गेले. आता हीच मंडळी शिवसेनेने गोंधळात चर्चेविना प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप करीत आहेत, अशी टीका सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. महापौर मीनाक्षी शिंदे या नाराज असल्याचे वृत्तही फेटाळून लावत त्या भिवंडी व पनवेल निवडणुकीत व्यस्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

ठाणे महापालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेते नियमित ३९५ आणि आयत्या वेळचे ८२ प्रस्ताव चर्चेविना मंजूर केल्याने सत्ताधारी शिवसेनेवर चौफेर टीका होऊ लागली आहे. या मुद्दय़ावरून भाजपच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात एक दिवसाचे उपोषण केले. तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानिमित्ताने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरही चहूबाजूंनी टीका होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी दुपारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राष्ट्रवादीला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला.

सर्वसाधारण सभेत प्रस्तावांवर भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चर्चा करणे अपेक्षित होते. या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. आता हीच मंडळी सेनेने गोंधळात प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप करीत आहे, असे म्हस्के म्हणाले. स्थायी समिती स्थापन झाली नसल्याने अधिकचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आणले होते. या प्रस्तावांना यापूर्वी सभेने मान्यता दिली असून केवळ निविदा प्रक्रियेस मान्यता देण्यासंबंधीचे हे प्रस्ताव होते, असेही ते म्हणाले. पावसाळ्या पूर्वीच्या अनेक कामांचे प्रस्ताव विषय पटलावर असल्यामुळे त्यांना मंजुरी देणे गरजेचे होते. मात्र, या प्रस्तावांना विरोध करून कामे ठप्प करण्याचा विरोधकांचा डाव होता. तो सफल होऊ शकला नाही म्हणूनच आता सेनेवर आरोप केले जात आहेत, असेही ते म्हणाले.