उच्चभ्रू वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत

ठाणे : दिवाळीच्या काळात ठाणे तसेच घोडबंदर भागातील उच्चभ्रू वस्तींमध्ये फटाके फोडण्यामुळे आवाजाची पातळी १०० ते १०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या सर्वेक्षणात नुकतीच समोर आली होती. असे असतानाच यंदाची दिवाळी फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यासंबंधी केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी प्रतिसाद दिल्याने हवा आणि ध्वनिप्रदूषणामध्ये वाढ झालेली नसल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केला आहे. या दाव्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दिवाळी काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यामुळे हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होते. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांच्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीच्या काळात शहरातील विविध भागात ध्वनीचे मापन करण्यात येते. यंदा केलेल्या ध्वनी मापनामध्ये घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट आणि वसंत विहार येथील हिरानंदानी मिडोज या भागात फटाके फोडण्यामुळे आवाजाची पातळी १०० ते १०५ डेसिबलपर्यंत पोहचल्याचे समोर आले होते, तर नौपाडा येथील राममारुती रोड येथे ९५ डेसिबलपर्यंत तर, गोखले रोड येथे ९५ ते १०० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली होती. पाचपाखाडी येथे ९० डेसिबल, कोपरी येथील आनंद सिनेमा परिसरात ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये फटाके फोडण्याचे प्रमाण घटले होते. मात्र यंदा हे प्रमाण वाढल्याचेही समोर आले होते. असे असतानाच ठाणे महापालिकेने मात्र हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ झालेली नसल्याचा दावा केला आहे.

दीपावलीपूर्व कालावधीत म्हणजेच २९ ऑक्टोबरला २४ तासांकरिता हवेतील धुलिकणांचे प्रमाण २२८  मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर होते. नायट्रोजन ऑक्साईड वायूचे प्रमाण २६ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर तर सल्फरडाय ऑक्साईड या वायूचे प्रमाण १५ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आढळले होते. त्याचप्रमाणे ध्वनीची अधिकतम तीव्रता ६८ डेसिबल नोंदविण्यात आली होती. तसेच ४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांकरिता हवेतील तरंगते धुलिकणांचे प्रमाण २३३ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके होते व नायट्रोजन ऑक्साईड या वायूचे प्रमाण ३० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर सल्फरडाय ऑक्साईड प्रमाण २० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर इतके आढळले आहे, तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १०  या कालावधीत ध्वनी तीव्रता अधिकतम म्हणजेच ७२ डेसिबल इतकी आढळली आहे. दीपावली कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत वाढ झालेली नाही. असा दावा महापालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे.

पालिका म्हणते, जनजागृतीचा परिणाम

२०१९ मध्ये दिवाळीपूर्व तसेच दिवाळी कलावधीमध्ये धुळीच्या प्रमाणात ५७ टक्के वाढ झालेली आढळली होती. परंतु त्यावेळेस ध्वनिप्रदूषण कमी होते. २०२० मध्ये करोना परिस्थितीमुळे दिवाळीपूर्व तसेच दिवाळी कलावधीमध्ये हवा प्रदूषणात वाढ आढळली नव्हती आणि ध्वनिप्रदूषणही कमी होते. २०२१ मध्ये काही अंशी करोना परिस्थिती आटोक्यात असली तरी दिवाळीपूर्व तसेच दिवाळीत हवा प्रदूषणात वाढ आढळली नाही. गेले चार ते पाच वर्षे सातत्याने होत असलेल्या जनजागृतीमुळे तसेच हरित फटाक्यांच्या वापरामुळे दिवाळी कालावधीत हवा तसेच ध्वनिप्रदूषणात वाढ आढळली नाही, असा दावा पालिकेने केला आहे.

ठाण्यात यंदा लक्ष्मीपूजाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले. शहरातील मोठ्या गृहसंकुलांमध्ये मध्यरात्री ३ वाजेपर्यंत फटाके वाचवण्यात येत होते. यंदा फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे मोजणीतून समोर आले आहे. हवा प्रदूषणाची मोजणी केलेली नसल्यामुळे त्याबाबत सांगता येणार नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके वाचवण्यात आले असले तरी पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी फटाके वाचवण्याचे प्रमाण कमी होते.  – डॉ. महेश बेडेकर,  सामाजिक कार्यकर्ते