मानपाडा रस्त्यावर वाहतूक कोंडी; तात्पुरती सोय करण्याची मागणी
मानपाडा रस्त्याचे चार रस्ता ते शिवसेना मध्यवर्ती शाखेपर्यंत सिमेंट रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या रस्त्यावरून मानपाडय़ाकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू आहे. या एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर दुचाकी वाहनांचा तळ आहे. हा तळ सीमेंट रस्ता पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात यावा, अशी मागणी या रस्त्यावरून नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मानपाडा रस्त्याच्या अर्धवट स्थितीत असलेल्या भाऊसाहेब पाटणकर चौक (चार रस्ता) ते शिवसेना शाखेजवळील रस्त्याच्या सीमेंटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडून जाणारी वाहतूक मानपाडा रस्त्याने सुरू आहे. त्यामुळे मानपाडा रस्त्यावर सध्या एकाच बाजूने रहदारी सुरू आहे. अशा गुदमरलेल्या आणि कोंडीच्या रस्त्यावर एका बाजूला दुचाकी स्वार वाहने उभी करून निघून जात आहेत. ही वाहने शाखेपासून ते कस्तुरी प्लाझा इमारतीपर्यंत उभी असतात. संध्याकाळच्या वेळेत या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या रिक्षाचालक, खासगी वाहन चालकांच्या तक्रारी आहेत. या रस्त्यावर कोंडी झाली की, लोकल प्रवासाला कंटाळून आलेला नागरिक या कोंडीत अडकतो. अनेकांना घरी जाण्याची घाई असते. त्यांना या कोंडीचा सामना करावा
लागतो.
सीमेंट रस्ता पूर्ण होईपर्यंत मानपाडा रस्त्यावरील दुचाकी वाहनतळ वाहतूक विभागाने हटवावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या वाहनांना रामनगर, शिवमंदिर रस्ता भागात तात्पुरती व्यवस्था करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
मानपाडा रस्त्यावरील दुचाकी वाहनतळ सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत बंद करण्यात येत आहे. या ठिकाणी वाहने उभी करू नयेत असे फलक लावले आहेत. तरीही सकाळच्या वेळेत किमान ५० ते १०० दुचाकी स्वार वाहने उभी करून निघून जातात. पुन्हा ही वाहने टोईंग व्हॅनने आणली तर, ती ठेवायची कोठे अशी एक समस्या आहे. प्रवाशांच्या सूचनेची दखल घेऊन हा वाहनतळ तात्पुरता रामनगर, शिवमंदिर रस्ता भागात स्थलांतरित करता येतो का याचा आपण विचार करीत आहोत.
-जयवंत नगराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, डोंबिवली