ठाणे : मुंबई महानगरातील शहरांच्या तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाच्या झळांमुळे नागरिकांच्या अंगाची काहीली होऊ लागली असून त्यापाठोपाठ आता उष्मघाताच्या त्रासामुळे दिवसाला सुमारे शंभर पक्षीप्राणी जखमी होत असल्याचे समोर आले आहे. उष्मघाताच्या त्रासामुळे चक्कर येऊन खाली पडल्यामुळे पक्षांचे पंख आणि पायाला इजा होत आहे तर, जखमी झालेल्या प्राण्यांवर इतर प्राणी हल्ले करीत असल्याने त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक होत असल्याचे समोर आले आहे. तसेच उपचारासाठी दाखल होणाऱ्या प्राण्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढताना दिसून येत असून दिवसाला सरासरी १५ ते २० पक्षीप्राण्यांचा मृत्यु होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई तसेच आसपासच्या शहरात मार्च महिन्याच्या अखेरीपासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. एप्रिल महिन्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. नागरिकांच्या अंगाची काहीली होऊ लागली आहे. सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत उन्हाच्या झळा कायम असतात. तर, सायंकाळी आणि रात्री उष्ण वातावरण असते. यामुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे उष्मघाताचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना काही महत्वाच्या सुचना केल्या जात आहेत.

हेही वाचा – तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर

उष्मघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून काळजी घेतली जात असतानाच, आता उष्मघाताच्या त्रासामुळे दिवसाला सुमारे शंभर पक्षीप्राणी जखमी होण्याचे प्रकार वाढू लागला आहे. मुंबई शहरात दिवसाला गेल्या चोवीस तासाता ५० हून अधिक पक्षी आणि प्राणी जखमी झाल्याचे प्राणी मित्रांना आढळून आले असून यात वटवाघुळ, खार, माकड, लंगुर, वानर, पोपट, कोकीळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे. यामधील १५ प्राणी पक्ष्यांचा मृत्यु झाला आहे तर, तीन ते चार प्राणी पक्ष्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित प्राणी आणि पक्षांवर उपचार सुरु आहेत. विक्रोळी, खार, ठाणे याठिकाणी जखमी पक्षीप्राण्यांवर उपचार केले जात आहेत. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड याठिकाणी दिवसाला १५ ते २० जखमी पक्षी प्राणी आढळून येत आहेत.

वाढत्या उष्माघातामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन हवेत उडतानाच जमिनीवर कोसळून पक्षी जखमी होतात. यामुळे पंख तुटणे, पायाचे हाड मोडणे अशी इजा पक्षांना होते. तर, उष्मघातामुळे प्राणी खाली पडतो. जखमी अवस्थेत असलेल्या प्राण्यांवर इतर प्राणी हल्ले करतात. यामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊन त्यांचा मृत्यु होतो, अशी माहिती आरएडब्ल्युडब्ल्यु या संस्थेचे सदस्य आणि मानद वन्यजीव सदस्य पवन शर्मा यांनी सांगितले. तर, वाढत्या उष्माघातामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन हवेत उडतानाच जमिनीवर कोसळून पक्षी जखमी होण्याचे प्रकार वाढत आहे. २० मार्चपासून पक्षांना उष्मघाताचा त्रास होऊ लागला असून एक ते दोन पक्षी दिवसाला उपचारासाठी दाखल होत होते. परंतु गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ होताच दिवसाला तीन ते चार पक्षी जखमी होत आहेत. या पक्षांना प्राणी मित्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल करित आहेत. यामध्ये ससाणे, घार, घुबड, चिमणी आणि कबुतरांचा समावेश आहे, अशी माहिती एसपीसीए रुग्णालयाचे संचालक डॉ. सुहास राणे यांनी दिली.

हेही वाचा – कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई महानगर क्षेत्रात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, समुद्र किनारा, खाडी किनारी भागातील खारफुटी, जंगले परिसर आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळून येतात, मानद वन्यजीव सदस्य पवन शर्मा यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animals and birds suffering from heat stroke in mumbai metropolis around 100 birds are injured every day mumbai print news ssb
Show comments