बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून उकाडा सहन करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना गुरुवारी काही अंशी दिलासा मिळाला. गुरुवारी सरासरी तापमान बुधवारपेक्षा दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होते. जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मुरबाड तालुक्यात झाली. मुरबाड मध्ये ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले मात्र उर्वरित जिल्ह्यात सर्व ठिकाणी ४० अंश सेल्सिअसच्या खाली पारा होता. तापमानात घट झाली असली तरी उकाडा मात्र जाणवत होता.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात तापमानाचे नवनवीन उच्चांक पाहायला मिळाले. बुधवार आणि मंगळवार या दोन दिवसात ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला होता. बुधवारी जवळपास सर्व शहरांमध्ये ४१ ते ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे नागरिकांना भीषण उकडायला सामोरे जावे लागले. बुधवारी अशाच प्रकारे तापमानाची शक्यता होती. मात्र सकाळपासूनच तापमानात घट दिसून आली.

हेही वाचा…ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार

ठाणे जिल्ह्यातील सरासरी तापमान ३९ अंश सेल्सिअस होते. तर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मुरबाड येथे झाली. त्या खालोखाल बदलापूर शहरात ३९.५, उल्हासनगर ३९.१, कल्याण ३८.७, डोंबिवली ३८.४, भिवंडी ३८.२, मुंब्रा ३७.९, कळवा ३७.७ तर ठाणे शहरात ३७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.