“मराठा समाजाची माफी मागून पुन्हा आरक्षण मिळवून द्या”; नितेश राणेंची ठाकरे सरकारकडे मागणी

ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे बोलत होते

Nitesh Rane demand to Thackeray government
(संग्रहीत)

ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे बोलत होते. 

नितेश राणे म्हणाले, “ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी सद्या स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते.”

“तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने २०१८ मध्ये कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती. मात्र, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील”, असे नितेश राणे यांनी सांगितले.

नितेश राणे म्हणाले, “केंद्र सरकारने घटनादुरस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. पण हे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Apologize to maratha community and get reservation again nitesh rane demand to thackeray government srk

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार