डोंबिवली शहराचा इतिहास जारच्या कल्याणइतका प्राचीन नाही. रेल्वे स्थानकाने मुंबईशी जोडल्या गेलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील या गावास २० व्या शतकाच्या सुरुवातीपासून शहरीकरणाचे वेध लागले. स्वातंत्र्योतर काळात मुंबईच्या विस्तारीत उपनगरांपैकी एक म्हणून विकसित झालेल्या या शहरात अनेक ज्ञातीचे लोक राहू लागले. त्यातील बहुतेक ज्ञातींनी आपापल्या समाजातील लोकांना एकत्र येता यावे म्हणून संस्था स्थापन केल्या. मराठा हितवर्धक मंडळ त्यापैकी एक. १९६६ मध्ये शिवाजीराव दळवी, विश्रामराव साळवी, जगन्नाथ खानविलकर, शांताराम देसाई, गजानन महादेव साळवी आणि बाबासाहेब देसाई यांनी लग्न समारंभासाठी सभागृह बांधण्याच्या हेतूने स्थापन केलेल्या या संस्थेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे.

सुरुवातीच्या काळात संस्थेला स्वत:ची वास्तू नसल्याने एखाद्या सभासदांच्या इमारतीच्या गच्चीवर बैठका आणि कार्यक्रम होत. मंडळाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधनही नव्हते. त्यामुळे अगदी दोन रुपये वर्गणी काढून संस्था कार्यक्रम साजरे करीत असे. निधी संकलनासाठी मंडळाने विविध उपक्रम राबविले. चित्रपटांचे विशेष खेळ आयोजित केले. लॉटरीच्या भाग्यवान सोडती काढल्या. त्यातून काही निधी हाती आल्यावर कर्ज काढून शहराच्या पश्चिम विभागात महात्मा फुले रस्त्यावर १९७५ मध्ये मराठा मंदिर ही इमारत उभारण्यात आली. इमारतीसाठी घेतलेले कर्ज १९८१ पर्यंत फेडले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वार्षिक

मेळावे, मुलांसाठी विविध स्पर्धा असे विविध उपक्रम अगदी सुरुवातीपासूनच मंडळाने राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठा मंदिर ही वास्तू केवळ लग्न समारंभाचे कार्यालय न ठरता विविध सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र झाले. वेळोवेळी मंडळाने अनेक उपक्रम राबविले. त्यातले काही दीर्घकाळ टिकले, काही अल्पकाळ राबविल्यानंतर बंद करावे लागले. लहान मुलांना मूल्य शिक्षण देण्यासाठी मंडळाने १९९८ मध्ये संस्कार केंद्र सुरू केले.
स्मिता तांबे, वर्षां कदम, आणि विद्या जकातदार संस्कार केंद्राचे काम पाहत. सलग तीन वर्षे हे वर्ग सुरू होते. पुढे जागेअभावी हा उपक्रम बंद करावा लागला. मंडळाचे साधारण तीन हजार सभासद असून ते वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. सुरुवातीच्या काळात आर्थिक गरजेपोटी मंडळाने सभागृहाचा काही भाग शाळा व दुकानांना भाडेपट्टीवर दिला होता. मात्र कालांतराने जागेची निकड भासू लागल्याने मंडळाने या जागा ताब्यात घेतल्या आणि तिथे एक छोटे सभागृह आणि संगणक कक्षाची सोय केली. मंडळाचा आणखी एक ठळक उपक्रम म्हणजे व्यायामशाळा.
१९९४ मध्ये व्यायामशाळेची स्थापना करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात या व्यायामशाळेच्या संयोजनात काहीशी शिथिलता आली होती. मात्र अलीकडेच नवी साधने आणून व्यायमशाळा अद्ययावत करण्यात आली आहे. रौप्यमहोत्सवानंतर १९९४ मध्ये मंडळाने मराठा मंदिर नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांची छोटी आर्थिक निकड भागू लागली.
फेब्रुवारी १९९७ पासून मंडळाने कॅन्सर निर्मूलन निधी सुरू केला. त्याद्वारे शहर परिसरातील कोणत्याही ज्ञातीतील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मंडळातर्फे अल्पशी का होईना पण मदत दिली जाते. मंडळाच्या सभागृहात लग्न समारंभाबरोबरच ज्ञातीतील विवाहइच्छुक वधू-वरांचे मेळावेही नियमितपणे आयोजित केले जातात. वधू-वर सूचक ही मंडळाची स्वतंत्र शाखा असून त्यातून आतापर्यंत शेकडो विवाह जुळले आहेत. माधवराव जाधव, जगन्नाथ गुजर आदींनी कोणताही मोबदला न घेता हे काम पाहिले.
गेल्या आठ वर्षांपासून संस्थेचे महिला भजनी मंडळ कार्यरत आहे. महिला समितीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जातो. डोंबिवलीत होणाऱ्या भजन मंडळ स्पर्धेत संस्थेतर्फे या महिला सहभागी होतात. तसेच सभासदांकडून आलेली निमंत्रणेही स्वीकारतात. संस्थेने त्यांच्यासाठी तबला हर्मोनियमची व्यवस्था केली आहे. त्यातून मिळणारी बिदागी मंडळातच जमा केली जाते. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील सभासदांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करता यावी म्हणून मंडळाने कर्जाऊ शिष्यवृत्ती योजना अमलात आणली. त्याचा उपयोग अनेक विद्यार्थ्यांनी करून घेतला आणि पैशाची परतफेडही केली.
अशा प्रकारे बहुउद्देशीय उपक्रम राबविणाऱ्या या संस्थेने सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर इमारत पुनर्बाधणीचा संकल्प केला आहे. त्याासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी विश्वस्त प्रकाश विचारे आणि मंडळाचे अध्यक्ष श्रीराम चाळके यांनी केले आहे.

मंडळातर्फे राबविण्यात येणारे उपक्रम
’ अद्ययावत सामुग्री असणारी सुसज्ज व्यायमशाळा
’ अंबिका योग कुटीरच्या सौजन्याने नियमित योगवर्ग
’ माफक दरात वधू-वर नोंदणी. अपंग/घटस्फोटितांची विनाशुल्क नोंदणी
’ कराटे वर्ग
’ माफक दरात संगणक प्रशिक्षण वर्ग
’ कर्जाऊ शिष्यवृत्ती योजनेत कमाल एक लाख रुपये पाच टक्के व्याज दराने दिले जाते.
’ कॅन्सर तसेच हृदयविकार झालेल्या रुग्णांना अल्प मदत दिली जाते. तसेच डायलेसिससाठी एका रुग्णास वर्षांतून एकदा हजार रुपये दिले जातात.
’ सभासदांसाठी दरवर्षी ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर सहलीचे आयोजन

टेबल टेनिस प्रशिक्षण
ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा मंडळाच्या वास्तूत भरविल्या जात. टेबल टेनिस क्रीडाप्रकार डोंबिवलीत रुजविण्यात मंडळाचे मोठे योगदान आहे. त्यातून अनेक खेळाडू घडले. त्यात राहुल लेले, नितीन भणगे, विजय राणे, सुनील साळवी, वंदना कामत, सचिन चिटणीस, संदीप कवळे, विनोद देशपांडे, शिल्पा टाकळकर, राहुल टाकळकर, निखिल तासकर, स्मिता दळवी, विलास खानविलकर, श्रुती कानडे, सुदेश भोसले आदींचा समावेश आहे. आता स्पर्धा होत नसल्या तरी टेबल टेनिसचे प्रशिक्षण आणि सराव सुरू आहे. क्रीडाप्रेमी नाना फडके, सुरेंद्र वाजपेई यांचे या उपक्रमासाठी मंडळास सहकार्य लाभले. प्रकाश म्हात्रे यांनी प्रदीर्घ काळ मंडळाच्या केंद्रात टेबल टेनिसचे प्रशिक्षण दिले.

मराठा हितवर्धक मंडळ, डोंबिवली
प्रशांत मोरे